
कॉंक्रिटीकरणासाठी श्री धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता बंद, भाविकांची निराशा
राजापूर शहरालगतच्या प्रसिद्ध अशा श्री देव धूतपापेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांसह पर्यटकांची गर्दी वाढत असताना कॉंक्रिटीकरण करण्याच्या नावाखाली राजापूर शहरातून मंदिराकडे जाणारा रस्ता गेले चार-पाच दिवस बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. अनेक पर्यटक शहरातून माघारी फिरत असल्याच्या तक्रारी धोपेश्वर ग्रामस्थांतून होत आहेत.
राजापूर तालुक्याचे आराध्यदैवत आणि राज्यभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिराचे तसेच परिसराचे नुकतेच सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांसह भाविकांची पावले या मंदिराकडे वळू लागली आहेत. वर्षा पर्यटनासाठी येणारे अनेक पर्यटक मंदिराला भेट देवून दर्शनासह येथील निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेत आहेत. त्यातच आता श्रावण महिना सुरू असल्याने श्री देव धूतपापेश्वर मंदिरात येणार्या भाविकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी तसेच श्रावणी सोमवारी मंदिरात मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
राजापूर शहरातून धूतपापेश्वर मंदिराकडे जाणार्या रस्त्याचे उन्हाळी हंगामात डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र खडपेवाडी ते धोपेश्वर घाटीदरम्यानच्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम रखडले होते. मागील ४-५ दिवसांपासून हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक वैशंपायन गुरूजी पुलाकडून वळविण्यात आली आहे. परिणामी धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता बंद असल्याने परजिल्हयातून धूतपापेश्वर मंदिरात येणारे पर्यटक शहरातूनच माघारी फिरत आहेत.www.konkantoday.com




