
11 वर्षानंतर पहिल्यांदाच देशातील 300 खासदार एकवटले, निवडणूक आयोगाच्या विरोधात एल्गार
देशात मत चोरीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील अनियमिततेबद्दल गंभीर आरोप केले होते
.एसआयआर’ आणि ‘मतचोरीच्या’ आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला आहे. इंडिया आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला असून त्यामध्ये विरोधी पक्षाचे 300 हून अधिक खासदार सहभागी झाले असून संसदेच्या मकर द्वार ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला असून काही खासदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी आंदोलन करताना तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृती बिघडली.
मात्र दिल्ली पोलिसांनी खासदारांच्या निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत. बॅरिकेड्स उभारून मोर्चा थांबवण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग असून निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि फलकही लावण्यात आले आहेत. संसदेपासून काही अतंरावरच हा मोर्चा अडवण्यात आला असून शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक खासदार तिथेच ठिय्या देऊन बसले आहेत.