
“राहुल गांधींनी सबळ पुरावे द्यावेत आणि.”, निवडणूक आयोगाने शकुन राणी डबल व्होटर आरोप प्रकरणी बजावली नोटीस!
EC Notice : दोन दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने भाजपाशी हात मिळवणी करत निवडणूक मॅनेज केल्याचा आरोप केला होता.
अंपायरच भाजपाशी हातमिळवणी करत असेल तर काय करणार? असाही सवाल त्यांनी केला होता. दरम्यान त्यांनी शकुन राणी यांना निवडणूक आयोगाने कसं डबल व्होटर केलं हे उदाहरणासह स्पष्ट करुन दाखवलं होतं. त्यावरुन आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. एवढंच नाही तर राहुल गांधींचे दावे दिशाभूल करणारे आहेत असंही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
शकुन राणी हे नाव घेत राहुल घेत राहुल गांधींचा आरोप काय?
‘नव्या मतदारांनी, तरुण मतदारांनी भाजपाला मतदान केलं असं सांगण्यात आलं. त्यासाठी फॉर्म ६ चा उपयोग करण्यात आला. पण ३३ हजार ६९२ नावांचा दुरुपयोग करण्यात आला. तुम्हाला एक उदाहरण देतो. शकुन राणी नावाची एक महिला आहे ही महिला ७० वर्षांची आहे. तिने दोन वेळा अर्ज क्रमांक ६ भरला. आता हे बघा शकुन राणी असं नाव आहे. या फोटोत याच महिलेचा फोटो झूम करुन लावण्यात आला आहे. दुसऱ्यांदा या महिलेने दोनदा अर्ज केला. दुसऱ्या अर्जावर हे नाव फक्त शकुनराणी नाव आहे. आडनावाचा रकाना रिकामा आहे. या महिलेने दोनदा मतदान केलं किंवा दुसऱ्यांदा तिच्या नावे दुसऱ्या कुणीतरी मतदान केलं.’ असा आरोप राहुल गांधींनी केला होता. तसंच देशभरात या घटना घडल्याचंही राहुल गांधी म्हणाले होते. आता निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावत उत्तर मागितलं आहे.
निवडणूक आयोगाने काय म्हटलं आहे?
१) राहुल गांधींनी ७ ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन भारतीय निवडणूक आयोगाने तुम्हाला कागदपत्रं दिली आहेत ती सादर करतो असं म्हटलं होतं. त्यात तुम्ही शकुन राणी या महिलेचं नाव घेतलं होतं आणि व्होटर आयडी कार्ड दाखवून या ठिकाणी दोन टिक मार्क आहेत असं म्हटलं होतं. हे टिक मार्क पोलिंग बूथ ऑफिसरचे आहेत.
२) शकुन राणी यांनी स्वतःच ही बाब सांगितली आहे की त्यांनी एकदाच मतदान केलं आहे दोनदा नाही. तुम्ही जो आरोप केला आहे त्याला काहीही अर्थ नाही.
३) राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत जे सादरीकरण केलं त्यात जी माहिती आणि कागदपत्रं सादर केली त्याची चौकशी केली असता हे कळतं आहे की जो टिकमार्क दाखवण्यात आला आहे तो मतदान अधिकाऱ्याने केलेला नाही.
४) शकुन राणी या महिलेने दोनवेळा मतदान केलं हा जो तुमचा आरोप आहे त्याचे सबळ पुरावे द्या. आम्ही निवडणूक कार्यालयाकडून याची चौकशी करतो.
५) शकुन राणी यांच्या प्रमाणेच मतदार यादीत बदल केला गेला आणि नावं हटवली गेली असा आरोप राहुल गांधींनी केला होता. आता आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन रुल्स १९६० च्या अन्वये शपथपत्रावर हस्ताक्षरासह जी नावं मतदार यादीत तुमच्या म्हणण्यानुसार नाहीत ती द्यावीत जेणकरून निवडणूक आयोग आपली कारवाई सुरु करु शकेल.