
रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडेची इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट स्पर्धेत घोडदौड सुरूच, पाचव्यांदा पटकावला सामनावीर पुरस्कार
प्रतिस्पर्धी संघानेही प्रदान केलं इंप्रेसिव्ह परफॉरर्मन्सचे मेडल
रत्नागिरीचा तरूण क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमधील कौंटी सामन्यात विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या कौंटी सामन्यात त्याने ७ विकेटस घेवून पाचव्यांदा सामनावीर पुरस्कार मिळविला आहे. तसेच सलग तीन सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा पराक्रमही त्याने केला आहे. काल झालेल्या सामन्यामध्ये अविराज याने सात विकेटस घेत स्वतःचाच आधीच्या सामन्यातील सहा विकेटस घेण्याचा विक्रम मोडला असून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
काल झालेल्या सामन्यामध्ये मिडलसेक्स पेशवा संघाने ६ विकेटस गमावत २९२ धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघ सीआरएस कार्डीनल्स या संघाला दिले. या धावसंख्येचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघाला फक्त १४७ एवढीच धावसंख्या उभारता आली. अविराजने सात विकेटस घेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा मोलाचा वाटा उचलला. त्याने आपल्या गुगलीवर ३ फलंदाज त्रिफळाचित करत ३ फलंदाजांना झेलबाद केले. तसेच एक फलंदाज एलबीडब्ल्यू करत प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. अविराजने ११ ओव्हर्स टाकत २ः३१ च्या सरासरीने फक्त २७ रन्स देत ७ विकेटस घेतल्या. त्याच्या या कामगिरीची दखल घेत त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे प्रतिस्पर्धी संघानेही अविराजला इंप्रेसिव्ह परफॉर्मन्सचा पुरस्कार म्हणून मेडल देवून त्याचे विशेष कौतूक केले.
रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचा बहुमान अविराजने मिळवला असून त्यामध्ये तो नवनवीन विक्रमांना गवसणी घालत आहे. त्यामुळे तो इंग्लंडमधील दिग्गज क्रिकेटपटूंचे लक्ष वेधून घेत आहे.