घटनातज्ञ ऍड. असीम सरोदे चिपळूण न्यायालयात;

माजी खासदार निलेश राणे यांच्या मारहाण प्रकरणात फिर्यादीची बाजू मांडणार

चिपळूण: देशाचे ख्यातनाम घटनातज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे प्रख्यात वकील ऍड. असीम सरोदे सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी चिपळूणमध्ये दाखल होणार आहेत. माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधातील एका जुन्या आणि महत्त्वाच्या खटल्यात ते फिर्यादी पक्षाची बाजू चिपळूण न्यायालयात मांडणार आहेत. एखाद्या मोठ्या खटल्यासाठी थेट घटनातज्ञ चिपळूणमधील तालुका न्यायालयात येत असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ऍड. सरोदे हे केवळ सर्वोच्च न्यायालयाचे वकील नसून, देशातील एक परखड आणि तरुण घटनातज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. संविधानातील तरतुदी स्पष्टपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. यामुळे त्यांचा दिल्लीसह देशभरात एक मोठा चाहता वर्ग आहे. आता ते थेट चिपळूणमध्ये येऊन एका मोठ्या खटल्याची बाजू मांडणार असल्याने प्रशासनासह सर्वच यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर आल्या आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असून, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि संदीप सावंत यांचे समर्थक त्यांचे स्वागत करणार आहेत.
नेमकं प्रकरण काय?
सण २०१६ मध्ये संदीप सावंत यांना मारहाण झाल्याचा एक गंभीर प्रकार घडला होता. माजी खासदार निलेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संदीप सावंत यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हा खटला सध्या चिपळूण न्यायालयात सुरू आहे. मात्र, या प्रकरणातील पोलीस तपासात अनेक त्रुटी राहिल्या असल्याचा संदीप सावंत यांचा आक्षेप आहे. सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ रेकॉर्डिंग, गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मारहाणीच्या वेळी आरोपींनी परिधान केलेले कपडे यांसारख्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संदीप सावंत यांनी या त्रुटींविरोधात वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे, जी अजूनही प्रलंबित आहे. कनिष्ठ न्यायालय आपल्यावर अन्याय करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. आपली याचिका वरिष्ठ न्यायालयात प्रलंबित असताना कनिष्ठ न्यायालय वॉरंट काढून आपल्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ न्यायालयात न्याय मिळेपर्यंत कनिष्ठ न्यायालयाने खटला चालवू नये, अशी त्यांची मागणी आहे. या सर्व मागण्या आणि कायदेशीर बाबींवर युक्तिवाद करण्यासाठी ऍड. असीम सरोदे चिपळूणमध्ये येत आहेत.
सोमवारचा दिवस चिपळूणच्या न्यायालयीन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, ऍड. सरोदे न्यायालयात नेमके कोणते मुद्दे उपस्थित करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button