
सीबीएसईने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतिकारी निर्णय जाहीर केला…
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतिकारी निर्णय जाहीर केला आहे. आता नववीच्या परीक्षा ‘ओपन बुक’ पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.या नव्या नियमांनुसार, विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान त्यांची पाठ्यपुस्तके, नोट्स आणि संदर्भ साहित्य वापरण्याची मुभा असेल. या निर्णयाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा तणाव कमी करणे आणि त्यांना विषयांच्या संकल्पनांची सखोल समज विकसित करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. “परीक्षेचा दबाव कमी करून विद्यार्थ्यांनी संकल्पना किती समजून घेतल्या आहेत, यावर लक्ष केंद्रित केले जाईल.”, असे CBSE ने स्पष्ट केले आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे विषयांचे आकलन सुधारेल आणि शिक्षण पद्धतीत सकारात्मक बदल घडेल, अशी सीबीएसईला अपेक्षा आहे.
‘ओपन बुक’ पद्धत म्हणजे काय?
‘ओपन बुक’ परीक्षा पद्धतीत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी त्यांची पुस्तके, नोट्स आणि इतर संदर्भ साहित्य वापरण्याची परवानगी असते. या पद्धतीचा उद्देश केवळ पाठांतरावर अवलंबून न राहता, विद्यार्थ्यांनी विषयाच्या मूळ संकल्पना समजून घ्याव्यात, त्यांचे विश्लेषण करावे आणि त्यांचा योग्य वापर करावा, यावर भर देणे आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतनशील विचार, विश्लेषण आणि समस्येचे निराकरण करण्याची क्षमता वाढेल.