
राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी १५ ऑगस्ट प्लास्टिक ध्वज विक्रीवर बंदी आणावी..
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचरापेटीत, गटारात अन्यत्र फाटलेल्या अवस्थेत आढळतात.प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट न झाल्याने या राष्ट्र्र्रध्वजांची विटंबना अनेक दिवस पहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी पोलिसांनी बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पोलीस अधिकारी यांना देण्यात आले.
‘झंडा उँचा रहे हमारा’, असे अभिमानाने म्हटले जाते; पण त्याचवेळी लहान मुलांच्या हट्टापोटी खेळण्यासाठी घेतलेले किंवा वाहनांवर लावण्यासाठी घेतलेले कागदी आणि प्लास्टिकचे झेंडे रस्त्यावर पडलेले पहायला मिळतात. याने राष्ट्रध्वजाचा घोर अवमान होत आहे. क्रांतिकारकांनी जो ध्वज भूमीवर पडू नये, यासाठी लाठ्या खाल्ल्या, वेळप्रसंगी प्राणाचेही बलिदान दिले, त्यांच्या बलिदानाची ही क्रूर चेष्टाच नव्हे का? राष्ट्रध्वजाचा मान राखणे, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे यावेळी समितीच्या वतीने निवेदनात जनतेलाही आवाहन करण्यात आले आहे.
निवेदन देण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गोरक्ष विक्रम जोशी, शिवसेनेचे गुहागर तालुका विधानसभा निरीक्षक अनुराग उतेकर, प्रशांत उतेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजिंक्य ओतारी, देवव्रत तांबे, राजेश टोणे, विहीपीचे पराग ओक, समितीचे सचिन सकपाळ, विनायक जगताप, प्रभाकर खराडे आणि सनातन संस्थेचे ज्ञानदेव पाटील आदी उपस्थित होते.