रत्नागिरीत फोटोग्राफी वर्कशॉपला अभूतपूर्व प्रतिसाद

नामांकित फोटोग्राफर व डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट यांचे थेट मार्गदर्शन

रत्नागिरी : जिल्हा फोटो व व्हिडीओ व्यावसायिकांची सहकारी संस्था मर्यादित रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरीमध्ये प्रथमच आयोजित फोटोग्राफी कार्यशाळेला अभूतपूर्व यश प्राप्त झाले. शहरातील शिवाजीनगर येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये ८ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाची सुरुवात रत्नागिरी जिल्हा फोटो व व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा रत्नागिरीतील ज्येष्ठ छायाचित्रकार अजय बाष्टे हे आजारी असूनही त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून, भारतातील नामांकित फोटोग्राफर आणि नॅशनल अवॉर्ड विजेते देवदत्त कशाळीकर यांना एक झाड व फ्रेम देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे, देवरुखचे फोटोग्राफर शेखर जोगळे यांनी डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट संदीप भागवत यांना देखील एक झाड व फ्रेम देऊन सन्मानित केले.

या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील देवदत्त कशाळीकर आणि संदीप भागवत उपस्थित होते. कशाळीकर यांनी आधुनिक फोटोग्राफीच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी फोटोग्राफी क्षेत्रातील नव्या ट्रेंड्स, तंत्रज्ञानाचा वापर आणि कलात्मक दृष्टिकोन यावर सखोल विचार मांडले. तसेच, डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट संदीप भागवत यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर फोटोशॉपिंग, इंस्टाग्राम रील्स तयार करणे, व्हायरल मार्केटिंगच्या युक्त्या यावर विस्तृत मार्गदर्शन केले. उपस्थित छायाचित्रकारांना सोशल मीडियाचा योग्य वापर करून त्यांचा व्यवसाय कसा वाढवता येईल यावर ठोस टिप्स दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रत्नागिरीचे ज्येष्ठ छायाचित्रकार अजय बाष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य करणाऱ्यांची एक मोठी टीम कार्यरत होती. यामध्ये साई प्रसाद पिलणकर, परेश राजिवले, निलेश कोळंबेकर, सुबोध भुवड, अनिकेत जाधव, हर्षल कुळकर्णी, अनिकेत दुर्गवळी, विनय बुटाला, राजापुरचे जिवेश्चकंठश्च कलिम मुल्ला, चारु नाखरे, दिनेश शिंदे आणि शेखर जोगळे यांचे महत्त्वपूर्ण योगदान या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल ज्येष्ठ छायाचित्रकार अजय बाष्टे यांनी आपल्या भाषणात सर्व सहभागींना धन्यवाद दिले आणि भविष्यात अशा कार्यशाळांचे आयोजन अधिकाधिक करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील असंख्य फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स या कार्यशाळेत सहभागी होऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील कौशल्य वाढविण्याची संधी मिळवली. कार्यशाळेच्या अंतर्गत विविध तंत्रज्ञानाची माहिती, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील मार्केटिंग तंत्र आणि व्यवसायवृद्धीचे महत्त्वपूर्ण मुद्दे यावर चर्चा करण्यात आली. रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या वर्कशॉपने एक नवीन पर्व सुरू केले असून, येणाऱ्या काळात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button