
पटवर्धन हायस्कूलची नित्या फणसे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम!
- रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उंचावले
- डॉ. सुनील भोकरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव;
- प्रादेशिक स्पर्धेसाठी निवड
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS) मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘रेड रिबन प्रश्नमंजुषा’ स्पर्धेत रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलची इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी कुमारी नित्या संदीप फणसे हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याची मान उंचावली आहे. या यशामुळे नित्याची आता १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्रादेशिक स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे, आरोग्य सेवा पुणे व अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड आणि संचालक डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते नित्या फणसेला प्रथम क्रमांकाचे २५,००० रुपयांचे रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
जिल्हास्तरापासून राज्यस्तरापर्यंतचा या स्पर्धेच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात रत्नागिरी जिल्हा स्तरावर झाली होती. ज्यात जिल्ह्यातील ४४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये नित्या फणसे हिने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. ही राज्यस्तरीय स्पर्धा १० ऑगस्ट रोजी नवी मुंबई येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे पार पडली. या स्पर्धेतही नित्याने आपले नैपुण्य सिद्ध करत प्रथम क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे विजेते प्रादेशिक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरतात.त्यामुळे नित्याची निवड झाली आहे.
नित्याच्या या यशामागे रत्नागिरी जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे सचिन पाटील, सतीश कांबळे आणि दिपाली किंजळे यांचे मार्गदर्शन तिला लाभले. त्याचबरोबर, पटवर्धन हायस्कूलमधील शिक्षकवृंद तसेच तिचे आई-वडील यांच्या पाठिंब्यामुळे तिला हे यश संपादन करता आले.
नित्याने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
.