
चिपळुणातील पोलिस बांधवांना नागालँड आणि मणिपूरच्या विद्यार्थिनींनी मराठी गीत गाऊन केले रक्षाबंधन


नागालँड आणि मणिपूर येथून शिक्षणासाठी चिपळूणमध्ये आलेल्या विद्यार्थिनींनी चिपळूण पोलीस ठाण्यात एक आगळावेगळा ‘रक्षाबंधन’ उत्सव साजरा केला. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींनी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना राख्या बांधून त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.

चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागालँड व मणिपूर येथील अनेक विद्यार्थिनी एका छात्रावासात राहतात. शिक्षणानिमित्त घरापासून दूर असलेल्या या विद्यार्थिनींना आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिसांमध्ये आपले कुटुंबीय दिसले. त्यांनी (९ ऑगस्ट २०२५) चिपळूण पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, उप विभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण श्री. राजेंद्रकुमार राजमाने आणि पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे यांना राख्या बांधल्या. त्याचबरोबर, चिपळूण पोलीस ठाण्यातील उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनाही राख्या बांधून हा सण उत्साहात साजरा केला.

या प्रसंगी विद्यार्थिनींनी केवळ राख्याच बांधल्या नाहीत, तर मराठीतील ‘श्री. गणेश आगमन गीत’ गाऊन उपस्थितांना सुखद धक्का दिला. त्यांच्या या प्रेमळ कृतीमुळे सर्व पोलीस अधिकारी भारावून गेले.

यावेळी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन बगाटे यांनी या विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. आपल्या घरापासून दूर राहूनही त्यांनी मराठी संस्कृती आत्मसात केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सर्व विद्यार्थिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या