
गिलनेटद्वारे मासेमारीला प्रारंभ, मच्छिमारांची होतेय चांदी
वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही अनेक मच्छिमारांना समुद्रावर स्वार होणे शक्य झाले नव्हते. मात्र शनिवारपासून वारे थांबल्यानंतर समुद्रही शांत झाला आहे. त्यामुळे गिलनेटद्वारे मासेमारीला आरंभ झाला आहे. पूर्णगड ते वरवडे या परिसरात सध्या बांगडा, व्हाईट चिंगळं या मच्छिमारांना मिळत आहेत. पर्ससीननेट बंद असल्यामुळे बांगड्याला किलोला ३०० रुपये दर मिळत असल्याने मच्छिमार समाधानी आहेत.
ट्रॉलिंगच्या काही नौका मासेमारीसाठी गेल्या होत्या. पण अपेक्षित मासे मिळाले नाहीत. गिलनेटच्या नौकांना चार दिवसात मुहूर्त साधता आला नव्हता. वेगवान वार्यामुळे नौका समुद्रात नेणे शक्य नव्हते. वातावरण शांत झाल्यानंतर छोटे मच्छिमार मासेमारीसाठी रवाना झाले. सलग दोन दिवस चांगले गेले असून रिपोर्टही मिळाला आहे. सुरूवातीपासूनच बांगडा मिळत आहे. एका नौकेला १० टफ (एक टफ ३२ किलोचा) सरासरी तर ५० ते ६० किलो व्हाईट चिंगळ मिळतात. बांगड्याला किलोला २०० रुपये आणि चिंगळाला किलोला ३०० पासून रुपये दर आहे.www.konkantoday.com