
आमदार भास्कर जाधव सध्या वादाच्या भोवऱ्यात
कोकणातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुहागर तालुक्यातील हेदवतड येथे झालेल्या सभेत त्यांनी ‘खोतकी’ संदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन राजकीय व सामाजिक वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून जाधव यांच्यावर समाजातील ऐक्याला बाधा पोहोचविण्याचा आरोप केला आहे. संघाने एका पत्राद्वारे जाहीर निषेध नोंदवत, भास्कर जाधव यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
या पत्राला प्रत्युत्तर देताना आमदार जाधव यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय प्रवासाची आठवण करून दिली. त्यांनी ब्राह्मण समाजातील अनेक घरांचे उंबरठे झिजवल्याचे आणि त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे स्पष्ट केले. मात्र, हेदवतड सभेत केलेल्या विधानाबाबत ते ठाम राहिले. या संपूर्ण प्रकरणामुळे गुहागर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सोशल मीडियावरही या वादाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.या वादात आणखी रंग भरत, भास्कर जाधव यांनी आपल्या सोशल मीडियावर “किती बी समोर येऊद्या, एकटा बास” असा स्टेटस टाकला. या पोस्टनंतर ब्राह्मण समाजातील संताप आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. समाजातील काही प्रतिनिधींनी यावरून भास्कर जाधव यांच्यावर थेट टीकेची झोड उठवली आहे.ब्राह्मण सहाय्यक संघाने स्पष्ट इशारा दिला आहे की, आमदार जाधव यांची विधाने आणि त्यांचा आक्रमक पवित्रा याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून येईल. गुहागर आणि आसपासच्या भागात सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये वादाचे पडसाद उमटू लागले आहेत