
राज्यात अकरावी प्रवेशाच्या तब्बल चार फेर्या पूर्ण ,प्रवेशासाठी अद्यापही साडेनऊ लाखांवर जागा रिक्तच
राज्यात अकरावी प्रवेशाच्या तब्बल चार फेर्या पूर्ण झाल्या असून, आता सर्वांसाठी खुला प्रवेश ही फेरी राबविण्यात येत आहे. या फेरीसाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होतीपरंतु, या फेरीला आता 11 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, आत्तापर्यंत तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेशासाठी अद्यापही साडेनऊ लाखांवर जागा रिक्तच राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सर्वांसाठी खुला प्रवेश या फेरीत 3 लाख 48 हजार 874 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 8 ऑगस्टपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार होता. परंतु, त्याला मुदतवाढ देऊन 11 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहेअकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत चार नियमित फेर्यांनंतर सर्वांसाठी खुला प्रवेश ही फेरी राबविण्यात येत आहे. या फेरीसाठी 3 लाख 81 हजार 420 विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम अंतिम केले होते. त्यानंतर बुधवारी निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार कला शाखेसाठी 96 हजार 3, वाणिज्य शाखेसाठी 7 लाख 74 हजार 447, विज्ञान शाखेसाठी 1 लाख 75 हजार 334 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 525 महाविद्यालयांमध्ये एकूण 21 लाख 50 हजार 130 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 14 लाख 55 हजार 945 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी एकूण 10 लाख 34 हजार 666 विद्यार्थ्यांनी कॅपमधून, तर 1 लाख 60 हजार 304 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अशा 11 लाख 94 हजार 970 विद्यार्थ्यांनी शुक्रवारी प्रवेश घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्यापही 7 लाख 72 हजार 780 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 1 लाख 82 हजार 380 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 9 लाख 55 हजार 160 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.