
राखीच्या धाग्यातून सामाजिक बांधिलकी जपत जी. जी. पी. एस. गुरुकुलचा अनोखा रक्षाबंधन सोहळा
रत्नागिरी | प्रतिनिधी – रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधून रत्नागिरीतील जी. जी. पी. एस. प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थिनींनी शनिवारी, ९ ऑगस्ट रोजी हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, रत्नागिरी–लांजा संचलित जावडे येथील आश्रमशाळेस भेट दिली आणि आजचा दिवस संस्मरणीय केला.
या विशेष दिवशी गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी आश्रमशाळेतील सर्व मुलांना राखी बांधून त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. परस्पर प्रेम, विश्वास आणि बांधिलकीचे प्रतीक असलेल्या या सोहळ्यात मुलांनीही बहिणींचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या विशेष क्षणात मुला–मुलींमध्ये भावनिक बंध तयार झाला.
निवासी शाळेत राहून शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी विद्यार्थिनींनी खाऊ, शैक्षणिक साहित्य, कपडे अशा विविध भेटवस्तू मनापासून दिल्या. यावेळी त्यांनी शाळेच्या परिसराची पाहणी केली, वर्गखोल्यांमधील वातावरण अनुभवले आणि विद्यार्थ्यांचा दिवस कसा जातो, अभ्यासपद्धती याची माहिती घेताना त्यांच्या अडचणी व स्वप्नांविषयी जवळून संवाद साधला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेमध्ये गुरुकुल प्रकल्पातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थिनींचा संयुक्त सहभाग होता. प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देऊन उपक्रमाला आकार दिला. साहित्य देताना मुलींच्या डोळ्यांत उत्साह आणि समाधान दिसत होते, तर भेट मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञतेची भावना होती.
जावडे शाळेचे संस्थापक श्री. कांबळे सर, मुख्याध्यापक व शिक्षकांनी गुरुकुल गटाचे मनःपूर्वक आभार मानले. “अशा भेटी फक्त मदत देत नाहीत, तर मुलांच्या मनात ‘आपल्यासाठी कोणीतरी आहे’ ही भावना जागवतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शिकण्याची प्रेरणा दुपटीने मिळते,” असे हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटीचे संस्थापक माननीय संतोष कांबळे यांनी सांगितले.
हा उपक्रम केवळ वस्तूंची देवाणघेवाण नव्हता, तर मनांची जवळीक वाढवणारा, प्रेम–आपुलकी वाढवणारा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा एक हृदयस्पर्शी अनुभव ठरला. संपूर्ण कार्यक्रम गुरुकुल विभाग प्रमुख वासुदेव परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जी. जी. पी. एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर व र. ए. सोसायटीचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने पार पडला.