
मंत्र्यांचा दौरा जाहीर होताच ठेकेदारांनी केली पॅचवर्कची चलाखी
गणेशोत्सव अवघ्या २० दिवसांवर येवून ठेपला आहे. खड्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरशः चाळणच झाली असून यंदाही गणेशभक्तांना जीवघेणाच प्रवास करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा गुरुवारी पाहणी दौरा जाहीर होताच दौर्याआधीच ठेकेदारांनी चलाखी केली. मंत्र्यांसमोर शो शायनिंग करण्यासाठी मार्गातील खड्डे बुजवत ’पॅचवर्क’ करण्यात आले. तर महामार्गाच्या रखडलेल्या पट्ट्यातील ’डायवर्जन’ही काढले. मंत्र्यांच्या दौर्यादरम्यानच तत्परता दाखवणार्या ठेकेदारांची चलाखी चर्चेचाच विषय ठरली आहे.
फेब्रुवारी महिन्यात मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकार्यांसह संबंधित ठेकेदारांना सूचना करूनही तसूभरही फरक न पडता महामार्गाचे काम धिम्यागतीनेच सुरू आहे. याचमुळे यंदाच्या गणेशोत्सवातही चाकरमान्यांच्या मार्गात अडथळ्यांचे ’विघ्न’ कायमच राहणार आहे. रखडलेल्या महामार्गप्रश्नी सरकारवर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठवली जात असतानाच सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दुसर्यांदा मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौर्याचे नियोजन केले.
मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेलमधील पळस्पे येथून मंत्री भोसले पाहणी दौर्याला प्रारंभ करतील, असे जाहीर होताच ठेकेदारांची धावपळ उडाली. मंत्र्यांच्या दौर्याआधी खड्ड्यांचा पॅचवर्क पूर्ण करण्यात आला तर रातोरात डायवर्जनही हटवण्यासाठी लगबग सुरू झाली. महामार्गाच्या त्या-त्या ठेकेदारांकडून मार्ग सुस्थितीत आणल्याचा एकप्रकारे दिखावाच केल्याचे समोर आले आहे.www.konkantoday.com