
बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली रात्री महामार्ग पाहणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पाहणीसाठी आलेले सार्व. बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा दौरा अत्यंत धावता ठरला. रायगड जिल्ह्यातील पाहणी आटोपून रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर त्यांनी महामार्गावरील काही ठिकाणांची रात्री पाहणी केली, मात्र परशुराम घाटातील दुरवस्थेकडे पाठ फिरवली. येथील उड्डाणपुलाबाबत पॉवरहाऊस येथे नागरिकांनी तक्रारी मांडल्या.
परशुराम घाटात वारंवार अपघात होत असतानाही तेथील ’ब्लॅक स्पॉट्स’ची पाहणी न करता मंत्री थेट पुढे रवाना झाले. त्यामुळे स्थानिक नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी रायगड जिल्ह्यातील पळस्पे येथून त्यांचा दौरा सुरू झाला. मात्र सायंकाळपर्यत रायगड जिल्ह्यातच अधिक काळ त्यांचा गेल्याने गतवर्षीप्रमाणेच रत्नागिरी जिल्हयात त्यांना सायंकाळचे ७ वाजले. अंधार पडल्याने
कशेडी बोगद्यानंतर ते परशुराम येथे आले असताना आमदार शेखर निकम यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते थेट शहरात पॉवरहाऊस येथे थांबले. त्यानंतर तेथे माजी आमदार डॉ. विनय नातू भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, सुयोग चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांच्यासह नागरिकांनी त्यांना शहरातील उड्डाणपुलाच्या कापसाळपर्यंतच्या विस्तारासह पॉवरहाऊस येथील अडचणी सांगितल्या. दरम्यान उड्डाणपुलाच्या वाढीव कामाबाबतचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवले जाईल. येथील महामार्ग अडचणीसंदर्भात यापूर्वीच झालेल्या बैठकीत दखल घेऊन अधिकार्यांना योग्य त्या सूचना दिल्या गेल्याचे स्पष्ट केले. तर परशुराम घाटात उपाययोजनेबाबत सर्वेच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ७.४० वा. ते रत्नागिरीकडे रवाना झाले.www.konkantoday.com