
जमीनमोजणीसाठी ‘स्थानिक’ मंजुरी आवश्यक, भूमिअभिलेख विभाग; वहिवाटीच्या मापनासाठी आता नवीन नियम!
पुणे : पोटहिश्शाची मोजणी करायची आहे, तर आता महापालिका, नगरपालिका अथवा स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून ‘तात्पुरते रेखांकन’ (टेन्टेटिव्ह लेआउट) मंजूर करून घेणे भूमिअभिलेख विभागाने बंधनकारक केले आहे. त्यानंतरच तुमचा मोजणीचा अर्ज दाखल करून पोटहिश्शाची मोजणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे वहिवाटीनुसार मोजणी करून जमिनीच्या तुकड्यांमुळे होणारे वाद, त्यावर होणारी बेकायदा बांधकामे, त्यातून होणारे व्यवहार आणि त्यामुळे नागरिकांचे होणारे नुकसान टाळणे शक्य होणार आहे.
‘महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ आणि ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’नुसार (यूडीसीपीआर) कोणताही विकास करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
परंतु शहरांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर बेकायदा जमिनींचे तुकडे पाडले जातात. तसेच वहिवाटीची त्यांची मोजणी करून त्याआधारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सादर करून बांधकाम परवानगी घेतली जाते. त्यातून बेकायदा खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि अनधिकृत इमारती तयार होण्याचे प्रमाण वाढत आहे. ज्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे जमाबंदी आयुक्त व भूमिअभिलेख विभागाचे संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
अशी आहे नवीन प्रक्रिया
- भूमिअभिलेख विभागाने तात्पुरत्या मंजूर नकाशाच्या आधारे जागेची मोजणी करून स्थानिक विकास प्राधिकरणाकडे अहवाल पाठवणे
- महापालिका, नगरपालिका, प्राधिकरणे या नियमानुसार तपासणी करून नकाशाला अंतिम मान्यता देईल
- याची प्रत भूमिअभिलेख विभागाकडे सीमांकन व दुरुस्तीसाठी पाठवेल.
- भूमिअभिलेख विभाग सीमांकन आणि अभिलेख दुरुस्तीची कार्यवाही करेल.
- जेणेकरून भूमिअभिलेख विभागातील रेकॉर्डलादेखील त्यांची नोंद घेऊन नकाशांत बदल केले जाणार
यामुळे काय फायदे होणार
- जमिनीच्या हद्दी आणि क्षेत्रांबाबतीत वाद निर्माण होण्याचे प्रमाण कमी होईल.
- भूखंड किंवा सदनिका खरेदी करणाऱ्यांचे होणारे नुकसान टळेल.
- ‘यूडीसीपीआर’मधील तरतुदींनुसार चार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या भूखंडातील २० टक्के जागा अल्प, अत्यल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवण्याच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करणे शक्य होईल.
- वहिवाटची मोजणी करून त्यावर बांधकाम करणाऱ्याच्या प्रकाराला आळा बसेल.