
इतिहास प्रेमी संस्थेच्या नाराजी नंतर विजयदुर्ग किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दरवाजा बदलणार
विजयदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेले प्रत्येकी एक-एक टनाचे दरवाजे इतिहास संदर्भाशी मिळते जुळते नसल्याने अखेर काढण्यात येणार असल्याचे केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे विजयदुर्ग उपमंडळ संरक्षक सहायक राजेश दिवेकर यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे इतिहासप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
या दरवाजाची बांधणी आणि वापरलेले कोवळे लाकूड यासंदर्भात विजयदुर्ग ग्रामपंचायत, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग विभाग), गडकिल्ले संवर्धन संस्था (कोकण विभाग) या सर्वांनीच संताप व्यक्त करून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. ”आर्कोमो” कंपनीने हा दरवाजा विजयदुर्ग किल्ल्यासाठी बनविला होता. मात्र, इतिहासप्रेमी संघटना आणि अनेक व्यक्तींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाने आर्किमो कंपनीला हा दरवाजा काढून ऐतिहासिक संदर्भाशी मिळताजुळता दरवाजा आणि तत्कालीन पूरक दरवाजा नव्याने बनविण्यात यावा, असे सांगण्यात आले.




