
आरक्षणाचा तिढा सुटताच राज्यात मेगा शिक्षक भरती:शिक्षणमंत्री दादा भुसे
राज्यातील हजारो शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्याची प्रतीक्षा करणार्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आरक्षणासंदर्भातील विषय मार्गी लागताच राज्यात मेगा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी चंद्रपूर येथे केली. या भरतीमध्ये केवळ विषय शिक्षकांनाच नव्हे, तर कला आणि क्रीडा शिक्षकांनाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसंदर्भात नेमलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल शासनाला सादर केला आहे.
या अहवालाच्या आधारे आरक्षणाचा मुद्दा निकाली काढून लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. ही भरती पूर्णपणे आरक्षण धोरणानुसारच होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना महत्त्वाचे निर्देशही दिले. अधिकार्यांनी गावपातळीवरील शाळांना नियमित भेटी द्याव्यात, जेणेकरून स्थानिक अडचणी जागेवरच सुटतील, असेही ते म्हणाले.