
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? रांगेत शेवटी बसवल्याने चर्चांना उधाण
उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. गुरुवारी रात्री त्यांनी राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी बोलावण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली.उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, मतदार यादीतील कथित गैरव्यवहारावर यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र या बैठकीतील फोटो समोर आले असून, यामध्ये उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याचं दिसत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही सहाव्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं.इंडिया आघाडीतील महत्वाच्या नेत्यांपैकी उद्धव ठाकरे एक असतानाही त्यांना मागच्या रांगेत बसवल्याने अनेक अंदाज लावले जात आहेत. विशेष म्हणजे, कमल हसन यांना उद्धव ठाकरेंच्या पुढे स्थान देण्यात आलं होतं. कमल हसन यांच्याही मागे उद्धव ठाकरेंना बसवल्याने ते आता जास्त लाडके झाले आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत जागा कशी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.