
हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा- अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे
‘
रत्नागिरी, दि.7 ) : ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम गेले तीन वर्ष लोक चळवळ बनली आहे. याही वर्षी हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक झाली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, शिक्षणाधिकारी किरण लोहार आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील प्रांताधिकारी, तहसिलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले, पहिला टप्पा 8 ऑगस्टपर्यंत, दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट आणि तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट या तीन टप्प्यात करावयाच्या कार्यवाही बाबत शासनाकडून सूचना आलेल्या आहेत, त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. त्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.
निवासी उपजिल्हधिकारी श्री. सूर्यवंशी हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचनांबाबत माहिती देताना म्हणाले, हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तसेच शासकीय/निमशासकीय सहकारी/खासगी आस्थापना कार्यालयात, अमृत सरोवर, वारसा स्थळे या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा. अभिनयातील सूचनेनुसार ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम आयोजित करावेत. वारसा स्थळांच्या ठिकाणी रोषणाई करावी. शाळा, महाविद्यालयाने विविध विषयांवर स्पर्धा घ्याव्यात, रॅली, प्रदर्शनाचे आयोजन करावे. नाविन्यपूर्ण उपक्रम करावेत. पोस्ट विभागाने रक्षाबंधनासाठी राखी वेळेत संबंधितांना मिळेल, असे नियोजन करावे. आपण केलेल्या कार्यवाहीचे फोटो, व्हीडीओ शासनाकडून देण्यात आलेल्या लिंकवर अपलोड करावेत.
000