
राखी पौर्णिमेनिमित्त विद्यार्थिनींनी जवानांसाठी बनवल्या राख्या
रत्नागिरी, दि. ६ :- देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, येथील विद्यार्थिनींनी एक अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी स्वतःच्या हातांनी राख्या तयार करून त्या जिल्हा सैनिक कार्यालयाकडे सुपूर्द केल्या.
या उपक्रमाची संकल्पना महाविद्यालयाच्या प्राचार्य स्नेहा कोतवडेकर यांची होती. त्यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेविकांनी राख्या तयार केल्या. या राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचवल्या जातील. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना आपल्या वीर सैनिकांशी भावनिक नाते जोडण्याची संधी मिळाली.
राख्या सुपूर्द करताना जिल्हा सैनिक कार्यालयाचे कल्याण संघटक अनिल मोरबाळे, सुनिल कदम, कर्मचारी, तसेच महाविद्यालयाच्या एनएसएस स्वयंसेविका आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, जवानांच्या मनातही या राख्यांमुळे आत्मियतेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.