
महावितरणच्या वीज बिल डाऊनलोडसाठी आता ’लॉगिन’ अनिवार्य
सायबर सुरक्षितता तसेच वीज ग्राहक माहितीच्या गोपनीयतेसाठी महावितरणच्या लघुदाब वर्गवारीच्या वीजबिलाची पीडीएफ प्रत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी आता संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत प्रवेश (लॉगिन) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या सायबर सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा बदल करण्यात आला आहे.
महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरील ’वीजदेयक अवलोकन/भरणा’(View/Pay Bill) पेजवर लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांना चालू
महिन्याच्या वीजबिलाची पीडीएफ प्रत ऑनलाईन डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र याआधी केवळ १२ अंकी ग्राहक क्रमांक सबमीट करून वीजबिल डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध होती.
आता नव्या बदलात वीज बिल लॉगिनशिवाय ऑनलाईन भरण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. मात्र पीडीएफ वीजबिल डाऊनलोड करण्यासाठी नोंदणीकृत प्रवेश (लॉगिन) करणे अनिवार्य आहे.
www.konkantoday.com