भारतात दोन लाखांहून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत! अवयवदानाचे प्रमाण भारतात अत्यल्प!

मुंबई : भारतात दरवर्षी लाखो रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असतात, मात्र दात्यांची संख्या अत्यल्प असल्याने अनेकांना वेळेवर अवयव मिळत नाहीत परिणामी अवयवांच्या प्रतिक्षेतच बहुतेक रुग्णांना मृत्युला सामोरे जावे लागते. राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था (नोटो) च्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात दोन लाखांहून अधिक रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणासाठी, तर ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण यकृतासाठी प्रतीक्षेत आहेत. त्याचप्रमाणे ८ ते १० हजार रुग्ण हृदयाच्या प्रत्यारोपणासाठी, आणि सुमारे १,५०० रुग्ण फुफ्फुसांसाठी तातडीने अवयवय मिळण्याची वाट पाहत आहेत.

भारताचा अवयवदान दर अजूनही अत्यंत कमी असून तो फक्त ०.५ प्रति दशलक्ष लोकसंख्या आहे. तुलनेदाखल, स्पेनमध्ये हा दर ४९.६, तर अमेरिकेत ३६.१ आहे. ब्रेन-डेड दात्यांच्या माध्यमातून हृदय, यकृत, फुफ्फुस यांसारख्या अवयवांचे प्रत्यारोपण शक्य असते. मात्र अशा दात्यांची संख्या भारतात खूपच कमी आहे. २०२४ मध्ये संपूर्ण भारतात फक्त ७९० ब्रेन डेड दाते नोंदवले गेले, जे देशाच्या गरजांशी तुलना करता अत्यंत अपुरी संख्या आहे.

महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली असून गेल्या वर्षी १९८ ब्रेन डेड दाते नोंदवले गेले, हे देशातील सर्वाधिक असून त्यापाठोपाठ तेलंगणा (१२४), तामिळनाडू (११०) आणि कर्नाटक (८५) ही राज्ये आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर्स (झेडटीटीसी) कार्यरत असून, ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवयवांचे वेळीच वाहतूक करून प्रत्यारोपणास गती दिली जात आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये मुंबईत एका १६ वर्षीय मुलाच्या ब्रेन डेड अवस्थेनंतर त्याचे हृदय, दोन्ही मूत्रपिंड आणि यकृत यशस्वीपणे चार रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात आले होते.

मुंबईतही रुग्ण मोठ्याप्रमाणात प्रतिक्षेत

एकट्या मुंबईचा विचार करता ४००० किडनी रुग्ण किडनी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत तर दोन हजार रुग्ण लिव्हर मिळण्याची वाट पाहात असल्याचे झेडटीसीसीचे अध्यक्ष व अवयवदान चळवळीतील अग्रणी डॉ भरत शहा यांनी सांगितले. अवयवदान मोहीमेला सरकारचा व्यपाक पाठिंबा मिळण्याची गरज असून ब्रेन डेड रुग्णांचे अवयव काढणाऱ्या रुग्णालयांची संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. मुदलात अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णालयातच प्रामुख्याने अवयव काढण्याचे काम होते.

अवयव काढण्यासाठी फार मोठ्या व्यवस्थापनाची आवश्यकता नसते हे लक्षात घेऊन जास्तीतजास्त सेंटरना सरकारने मान्यता देणे गरजेचे आहे. तसेच ज्या रुग्णालयांना अवयव काढण्याची मान्यता मिळालेली आहे, अशा रुग्णालयांमध्ये ब्रेन डेड पेशंट किती आहेत तसेच तेथे नेमके काम कसे होते, याचे ऑडिट नियिमत केले गेल्यास निश्चितपणे अवयवदानाचे प्रमाण वाढेल, असेही डॉ भरत शहा यांनी सांगितले.

सरकारकडून जागरूकतेसाठी अनेक मोहिमा राबवण्यात येत असून, शाळा-महाविद्यालयांमध्ये अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे उपक्रम राबवले जात आहेत. मात्र ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये अजूनही धार्मिक, सामाजिक आणि भावनिक अडथळ्यांमुळे अवयवदानास नकार दिला जातो. विशेषतः ब्रेन डेड अवस्थेतील रुग्णाच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन संमती मिळवणे हे मोठे आव्हान ठरते. भारतासारख्या देशात दरवर्षी लाखो अपघात होतात आणि अनेक ब्रेन डेड रुग्ण निर्माण होतात. जर या सर्वांची यथायोग्य नोंद घेऊन त्यांचे अवयव वापरता आले तर मोठ्या प्रमाणात रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी उपलब्ध होऊ शकतील.

अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प

नोटो आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, सध्या देशात प्रतीक्षा यादीत असलेल्या रुग्णांची एकंदर संख्या २.६ लाखांपेक्षा अधिक असून प्रत्यक्षात उपलब्ध होणाऱ्या अवयवांची संख्या फक्त १० टक्के आहे. यामध्ये मूत्रपिंडासाठी डायलिसिसवर असलेल्या हजारो रुग्णांचा समावेश असून, यकृत विकृती, हृदय निकामी होणे, किंवा श्वसनसंस्थेचे गंभीर आजार यामुळे देखील प्रत्यारोपण गरजेचे ठरते. २०१९ पासून सरकारने ‘राष्ट्रीय अवयवदान आणि प्रत्यारोपण कार्यक्रमांतर्गत नोंदणी, समन्वय आणि प्रशिक्षण यावर भर दिला आहे. मात्र अद्यापही देशात ‘प्रिझ्युम कंन्सेट’ प्रणाली लागू नाही. ही प्रणाली लागू झाल्यास, एखाद्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी अवयवदानास विरोध केला नसेल, तर त्याचे अवयव वापरण्यास कायदेशीर परवानगी मिळू शकते. ही प्रणाली स्पेन, ऑस्ट्रिया, बेल्जियमसारख्या देशांमध्ये यशस्वी ठरली आहे.

भारतात आजही ‘अवयवदान म्हणजे जीवनदान’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने रुजलेली नाही. दरवर्षी हजारो रुग्ण योग्य वेळी अवयव न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडतात. हे चित्र बदलण्यासाठी केवळ सरकारी उपाययोजना नव्हे तर प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. मृत्यूनंतर एखाद्या अवयवाने दुसऱ्याचे आयुष्य वाचू शकते ,याची जाणीव आणि कृती हीच काळाची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button