
ज्याने पोहायला शिकवले त्याला बुडवायचा प्रयत्न करू नका अन्यथा तोही तुम्हाला बुडवू शकतो : सचिन बाईत

“याच सभागृहात शिंदे सेनेचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात काही लोकांनी पक्ष प्रवेश केला आणि हे लोक सत्तेसाठी गेले. साहेब आम्ही तुमच्या पाठीशी सत्यासाठी आहोत; परंतु जे लोक सत्तेसाठी गेले त्यांच्यासाठी ज्याने पोहायला शिकवले त्याला बुडवायचा प्रयत्न करू नका अन्यथ: तोही तुम्हाला बुडवू शकतो,” अशी गर्जना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी केली.
गुहागर तालुक्यातील खारवी समाज सभागृह हेदवतड येथे ठाकरे शिवसेनेचा वेळणेश्वर गटाचा शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना उत्तर देण्यासाठी जाहीर मेळावा उत्साहात झाला. यावेळी तालुकाप्रमुख बाईत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, “खऱ्या अर्थाने या गटाचे चित्र पाहिले तर संपूर्ण गट हा आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, याची आजची उपस्थिती साक्ष देते. या गटात असे चित्र विरोधकांनी निर्माण केले की मच्छीमार समाज बाजूला जातोय; परंतु आज आमच्या व्यासपीठावर मच्छीमार समाजाचे नेते उपस्थित राहिले ही सत्याची बाजू आहे. मच्छीमार समाजाला नेतृत्व आमच्याच पक्षातून मिळू शकते. मच्छीमार समाजाचे प्रश्न विधानसभेत आमदार भास्कर जाधव यांनी सोडवले आहेत. त्यांच्या घरा खालच्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा भास्करशेठ जाधव साहेबांनी केली. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहनही बाईत यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, विक्रांत जाधव, सहदेव बेटकर, सुभाष मोहिते, विनायक मुळे, पाणगले गुरुजी, विलास गुरव, लतीफशेठ लालू, सौ. सिद्धी सुर्वे, अरुणा आंब्रे, पूर्वी निमुणकर, जयदेव मोरे, काशिनाथ मोहिते, रवींद्र आंबेकर, जगदीश गडदे, वनिता डिंगणकर, पारिजात कांबळे, स्नेहा वरंडे, प्रवीण ओक आदी उपस्थित होते. या मेळाव्याला हजारो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याचे प्रास्ताविक विनायक मुळे यांनी केले तर विलास गुरव यांनी सूत्रसंचालन केले.