
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याच जयघोषात आज लाडक्या गणरायाला निरोप दिला, मुंबईतील हजारो सार्वजनिक मंडळांचे आणि घरगुती गणपतींचे विसर्जन
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याच जयघोषात आज लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाची दहा दिवस भक्तीभावाने पूजा करण्यात आली.यानंतर आज विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटींसह इतर विसर्जन स्थळं ही विसर्जनासाठी सज्ज झाली आहेत. मुंबईतील हजारो सार्वजनिक मंडळांचे आणि घरगुती गणपतींचे विसर्जन आज या ठिकाणी केले जाणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मुंबई पोलीस आणि महानगरपालिका सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पोलिसांकडून प्रथमच AI तंत्रज्ञानाचा वापर
यंदा गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिसांकडून प्रथमच एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यंदा 6500 सार्वजनिक गणेश मंडळे आणि दीड लाख घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी 25 हजार पोलीस कर्मचारी आणि 10 हजार महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. तसेच, वाहतूक आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.मुंबईतील गणपती मंडळापैकी प्रमुख आकर्षण असलेल्या लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेश गल्ली), चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा, खेतवाडीचा महाराजा या मंडळांकडून विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अवघ्या काही वेळातच मुंबईतील गणपती हे विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहेत. मुंबईचा राजा गणेशगल्लीची विसर्जन मिरवणूक सकाळी ८ वाजता सुरु होईल. त्यापूर्वी आता बाप्पाची आरती केली जात आहे. दरवर्षी गणेशगल्लीचा गणपती विसर्जनासाठी निघाल्यावरच इतर मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात होते.
तर दुसरीकडे लालबागच्या राजाची दर्शन रांग बंद करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता मंडळाच्या मंडपातून लालबागच्या राजाची मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक उद्यापर्यंत सुरु राहते. तसेच परळचा राजा या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.




