
आजीची भाजी रानभाजी कमजोरी दूर करणारी कुर्डू
*याला कुर्डू पांढरा कोंबडा, मोरपंख असे सुध्दा स्थानिक नावाने ओळखले जाते. सांधेदुखी जाण्यासाठी, कमजोरी दूर करण्यासाठी, थकवा जाण्यासाठी, मूतखडा बाहेर काढण्यासाठी, दाताचे विकार नाहीसे करण्यासाठी याचा फायदा होतो. तोंडाचे विकार, स्त्रियांच्या तक्रारी, जास्त रक्तस्त्राव, मूत्रपिंडाच्या तक्रारी अशा अनेक व्याधींवर ही वनस्पती उपयुक्त आहे. कूर्डू ही वनस्पती त्री दोष नाशक म्हणजे कफ, वात, पित्तशामक आहे. या वनस्पतीच्या फुलांमध्ये काळे व चमकदार बीज असते. हे बीज आयुर्वेदामध्ये अतिउपयुक्त मानले जाते.
आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे कूर्डू..
आपल्याला वारंवार लघवी होत असेल, लघवी करतेवेळी दुखत असेल, जळजळ होत असेल तर या बियांचे चूर्ण दोन ग्रॅम आणि खडीसाखर दोन ग्रॅम याप्रमाणे दोन वेळा दिवसातून घेतल्यास समस्या दूर होतात. बियांची पावडर व अर्धा चमचा मध एकत्र करुन घेतल्यास सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी सेवन केल्यास मूतखड्याचा त्रास नाहीसा होण्यास मदत होते. कुर्डूच्या पानांची भाजी दिवसातून एकदा असे चार ते पाच दिवस खाल्ल्यास पोट एका दमात साफ होवून, पोटातील घाण बाहेर काढणारा हा आयुर्वेदातील सर्वोत्तम उपाय आहे.
ज्यांना झोप येत नसेल तर याची भाजी अवश्य खावी त्यांना शांत झोप लागेल. एक ग्रॅम चूर्ण व खडीसाखर सोबत खाल्ल्यास ज्यांची कामशक्ती कमी झाली आहे अशांसाठी फायदेशीर ठरेल. कच्चे पान जरी धुवून खाल्ले तरी कमजोरी थकवा नाहीसा होईल.
कढईत तेल गरम करुन लसूण, मिरची फोडणीला टाकावी. हिंग, हळद, कांदा घालून परतून घ्यावी. एखादा बारीक चिरलेला टोमॅटो आणि कुर्डूची निवडलेली भाजी त्यामध्ये टाकावी. झाकण ठेवून थोडावेळ शिजू द्यावे. थोड्या वेळाने चवीपुरते मीठ घालून ही परतून घ्यावी. तीन-चार मिनीटांनी ओले खोबर गॅस बंद करा.
*-प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते*
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी