
वैभववाडी – कोल्हापूर लोहमार्गाची चाचपणी.!
सावंतवाडी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला लोहमार्गाने जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वैभववाडी – कोल्हापूरदरम्यान रेल्वेमार्गाबाबत खासदार नारायण राणे यांनी अलीकडेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. या प्रकल्पाला गती देण्याच्या विनंतीला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सुरेश प्रभू आणि ममता बॅनर्जी यांच्या काळात दोन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण मंजूर झाले होते. मात्र, त्यानंतर फारसे काही झाले नाही.
हा मार्ग झाल्यास मुंबई, गोवा, कर्नाटक आणि केरळ यांना जोडणाऱ्या कोकण रेल्वे मार्गाचे महत्त्व वाढेल. कोकणातील मासे, आंबा, काजू आणि पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादनांची वाहतूक अधिक वेगाने शक्य होईल. त्यामुळे व्यापार, पर्यटन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. त्याबरोबरच चिपळूण – कराड मार्गाचाही प्रस्ताव विचाराधीन आहे.