
मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सव कालावधीत येणा-या चाकरमानी लोकांना दरवर्षी प्रमाणे खड्डयातूनच मार्ग काढत यावे लागणार
कोकणातून जाणा-या मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याला पडणाऱ्या खड्डयांपुढे आता ठेकेदार देखील हतबल झाले आहेत. वाढलेल्या या मार्गावरील वहातुकीमुळे खड्डे बुजविण्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने गणेशोत्सव कालावधीत येणा-या चाकरमानी लोकांना या दरवर्षी प्रमाणे खड्डयातूनच मार्ग काढत यावे लागणार हे आता निश्चीत झाले आहे. मुंबई -गोवा मार्गाचे काम पावसाळ्यामुळे काही प्रमाणात मंदावले आहे. या महामार्गाचे काम गेली सतरा वर्ष सुरु आहे. मात्र काम संपण्याचे नावच घेत नाही.
अशा महामार्गावरील संगमेश्वर, रत्नागिरी व लांजा या भागात महामार्गाची परीस्थिती खुपच बिकट आहे. या ठिकाणी दिवसागणीत अपघात होत आहेत. अनेक लोकांना आपले प्राण गमावावे लागत आहेत. असे असतानाही राजकारणी नेते मंडळी महामार्ग पुर्ण होण्याची तारीख पे तारीख देत आहेत.संगमेश्वर तालुक्यातील आरवली, संगमेश्वर शहर तसेच बावनदी, निवळी भागात तसेच लांजा येथील पाली व लांजा शहर भागात रस्त्याची अवस्था भयानक आहे. चिखल व खड्डे यामुळे रस्ता दिसेनासा झाला आहे. वारंवार हे खड्डे बुजवण्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. मात्र वाढलेल्या वहातुकीमुळे हे खड्डे बुजविणे अवघड झाले आहे. वांरवार पडत असलेल्या खड्डयांपुढे ठेकेदार देखील हतबल झाला आहे.
राष्ट्रीय महामार्गाला पडलेल्या खड्डयां बरोबर काही ठिकाणी अद्यापही सिमेंटचा रस्ता खचत असल्याने व अशा रस्त्याला जात असलेले तडे व खड्डे आता हा गंभीर विषय बनू लागला आहे. नुकतीच अशा खड्डे पडलेल्या भागांची पहाणी राजापुरचे आमदार कीरण सामंत यांनी केली. व खड्डे बुजविण्याच्या सुचना केल्या. याआधी देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी या रस्त्याची पहाणी केली होती. तसेच दर शनिवारी या रस्त्यांचे खड्डे बुजविले जात आहेत किंवा नाही, हे बघणार असल्याचे सांगितले होते. मात्र याकडे आता पालकमंत्र्यांचे देखील दुर्लक्ष झाल्याने खड्डे बुजविण्याचे काम संथ गतीने सुरु आहे.अशा मार्गावरील खड्डे बुजण्याचे नावच घेत नसल्याने ठेकेदाराने देखील आपले हात टेकले आहेत. यामुळे आता येणा-या गणेशोत्सव कालावधीत चाकरमानी लोकांना दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील वाट काढत यावे लागणार हे आता निश्चीत झाले आहे.मुंबई गोवा महामार्ग कोकण वासियांची डोकेदुखी ठरला आहे. दरवर्षी येणा-या सणांमध्ये विघ्न आणण्याचे काम या महामार्गाने केले आहे. एकप्रकारे पैसा खाण्याचे कुरण हा मार्ग बनला आहे. त्यामुळे लवकर हा महामार्ग पुर्ण होईल याची आशा नाही. *– संतोष माने, चालक प्रवासी वहातुकदार, संगमेश्वर*