
भारतावर आरोप करणारे ट्रम्प स्वतः रशियाशी किती व्यापार करतात? धक्कादायक आकडेवारी समोर!
US Import from Russia : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ वाढविण्याची धमकी नुकतीच दिली. भारत आण रशिया यांच्यात होणाऱ्या व्यापारावर ते नाखूष असल्याचे म्हणाले. अमेरिका आणि रशियात यांच्यातही व्यापार केला जातो, हे भारतान निदर्शनास आणून दिल्यानंतर मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी सावध भूमिका घेतली. रशियाबरोबर व्यापार होतो, याची आपल्याला कल्पना नसल्याचे ते म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता डोनाल्ड ट्रम्प यांन बचावात्मक पवित्रा घेतला. “मला त्याबद्दल काहीच कल्पना नाही. मला याबद्दल माहिती घ्यावी लागेल”, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकाही रशियाबरोबर व्यापार करतो, या भारताच्या दाव्यावरून ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
अमेरिका-रशियाचा अब्जावधींचा व्यापार
युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हच्या आकडेवारीनुसार, अमेरिका आणि रशिया यांच्यात २०२४ या वर्षात एकूण ५.२ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे. यामध्ये ३.५ अब्ज डॉलर्स किमतीचा विविध वस्तूंचा व्यापार आहे. तर अमेरिकेने रशियाला ५२८.३ दशलक्ष डॉलर्सची निर्यात केली आहे. याशिवाय रशियातून ३ अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली.
तसेच यूएस सेन्सस ब्युरो आणि ब्युरो ऑफ इकॉनॉमिक ॲनालिसिसच्या ताज्या आकडेवारीनुसार रशियाकडून केल्या जाणाऱ्या आयातीमध्ये घट झाली आहे. २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यात २.५ अब्ज डॉलर्सची घट झाल्याचे समोर आले आहे. तर जानेवारी २०२२ पासून ते आतापर्यंत अमेरिकेने रशियाकडून विविध वस्तूंची २४.५१ डॉलर्स किमतीची आयात केली आहे.
प्रमुख आयात केलेल्या वस्तू
खते – अमेरिकेने २०२४ मध्ये रशियातून १.२७ अब्ज डॉलर्स किमतीची खते आयात केली.
युरेनियम आणि प्लुटोनियम – ६२४ दशलक्ष डॉलर्स किमतीचे युरेनियम आणि प्लुटोनियम आयात करण्यात आले.
पॅलेडियम – २०२४ साली ८७८ दशलक्ष डॉलर्सचे पॅलेडियम आयात करण्यात आले.
अमेरिकेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात होत असताना भारत आणि रशियाच्या व्यापारावर लक्ष वळविले जात आहे.
अमेरिकेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिटिव्ह (GTRI) ने ट्रम्प यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, जीटीआरआयने ट्रम्प यांच्या भूमिकेवर टीका केली. रशियातून मोठ्या प्रमाणात तेल आयात करणारा चीन आहे, तरीही ट्रम्प भारतालाच लक्ष्य करत असल्याची टीका त्यांनी केली.
२०२४ साली चीनने रशियाकडून ६२.६ अब्ज डॉलर्सचे तेल आयात केले होते. तर भारताने ५२.७ अब्ज डॉलर्सची आयात केली होती. पण ट्रम्प यांनी अद्याप चीनच्या खरेदीवर प्रश्न उपस्थित केलेले नाही, असा मुद्दा जीटीआरआयने उपस्थित केला.