
चिपळूण तालुक्यातील तांबडेकरवाडी येथे साडेपाच लाखाची गोवा बनावटीची दारू पकडली.
जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चिपळूण तालुक्यातील तांबडेकरवाडी येथे मोठ्या प्रमाणावर परराज्यातून (गोवा निर्मिती)दारू आणून साठा ठेवणार्या आरोपीस ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख यांच्या सूचनेवरून आणि कोल्हापूर विभागाचे उपायुक्त विजय चिचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी विभागाच्या अधिक्षक किर्ती शेंडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तांबडेकरवाडी येथे मिलिंद लक्ष्मण तांबटकर याचे राहते घरी ही कारवाई करण्यात आली.
तपासात 63 बॉक्स (556.92 लिटर) गोवा बनावटीच्या दारू मिळाली असून, याची एकूण किंमत 5,67,840 इतकी आहे. ही महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असून, फक्त गोवा राज्यात विक्रीस परवानगी आहे. या प्रकरणी आरोपी प्रविण गणपत तांबटकर (रा. तांबडेकरवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई), 90 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत रत्नागिरीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचारी, निरीक्षक सुनील आरस्कर, शुभम काडुळे, नितीन लोळे, मयूर शिंदे आणि वाहनचालक विशाल विचारे यांनी सहभाग घेतला. या गोव्यातील वाहतुकीबाबत कोणी माहिती देऊ इच्छित असल्यास 8422001133 किंवा टोल फ्री क्रमांक 18002339999 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास निरीक्षक सुनील आरस्कर करत आहेत.