
गुहागर हेदवतड येथे आज आमदार भास्कर जाधव यांची तोफ धडाडणार…
शिंदेंच्या मेळाव्याचा विक्रम तोडणार
आबलोली : गुहागर तालुक्यातील खारवी समाज सभागृहात ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा झाला त्याच ठिकाणी गुहागरचे कार्यसम्राट आमदार भास्कर जाधव आज (६ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता जाहीर मेळावा घेऊन कार्यकर्त्यात जल्लोष निर्माण करणार आहेत.
याबाबत बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, ६ तारखेला तुम्ही प्रत्यक्ष बघा माझ्याबरोबर कीती जनसमुदाय येतो. ते माझ्या पक्षातील चार कार्यकर्ते गेले असले, तरी चाळीस कार्यकर्ते निर्माण करण्याची धमक माझ्यात आहे आणि ते तुम्हाला आजच्या जाहीर मेळाव्यातून दिसून येईल. मी कृती करून दाखवतो, असा मार्मिक टोलाही विरोधकांना आमदार जाधव यांनी लगावला.
त्यामुळे आज हेदवतड येथे आमदार जाधव यांची तोफ धडाडणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळाव्याचा विक्रम आमदार भास्कर जाधव तोडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.