
गणेशोत्सव स्पर्धेसाठी समन्वय समिती स्थापन
रत्नागिरी, दि. ६ :- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या २० जून २०२५ च्या शासन निर्णयानुसार गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या समन्वयाखाली जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.
गणेशोत्सव मंडळांच्या निवड प्रक्रियेत आणि पुरस्कारांच्या निवडीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी या समित्या काम करतील. जिल्हास्तरीय समितीमध्ये उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय, हे अध्यक्ष तर पोलीस उपअधीक्षक पोलीस मुख्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन शाखा, क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्राचार्य, देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन आदी सदस्य आणि जिल्हा नियोजन अधिकारी, सदस्य सचिव आहेत.
तालुकास्तरीय समितीमध्ये संबंधित तालुक्याचे तहसिलदार अध्यक्ष तर संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी नगरपंचायत, क्षेत्रीय अधिकारी महाराष्ट्र प्रददूषण नियंत्रण मंडळ, तालुक्यातील नामांकित कलाशिक्षक हे सदस्य आहेत.
तालुकास्तरीय समिती जिल्हा समन्वय समितीकडून प्राप्त माहितीनुसार स्पर्धेत सहभागी गणेश मंडळांना प्रत्यक्ष उत्सव स्थळी भेट देवून मंडळांकडून व्हिडीओग्राफी व कागदपत्रे जमा करुन घ्यावीत. तालुक्यातील एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्याची सर्व कागदपत्रे व्हिडीओसह जिल्हा समितीकडे सादर करावीत. एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची शिफारस करून त्यांची नावे, कागदपत्रे आणि व्हिडिओ सीडी-पी.एच. देशपांडे कला अकादमी, मुंबई येथे सादर करण्याची जबाबदारी जिल्हा समितीवर आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळेल. इच्छुकांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.