
खाजगी संस्थेमार्फत गणपतीपुळेतून लवकरच सी-प्लेनची सुविधा उपलब्ध होणार
गणपतीपुळे आणि रत्नागिरीसह राज्यातील आठ ठिकाणी जलविमान (सी-प्लेन) सेवा सुरू करण्यासाठी हालचालींना गती आली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) वतीने खासगी संस्थेमार्फत या ठिकाणांवर ’वॉटर एअरड्रोम’ उभारणीसाठी व्यवहार्यता सर्वेक्षण सुरू झाले आहे. येत्या तीन महिन्यांत याचा अहवाल सादर होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष सी-प्लेन सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.
राज्यातील पर्यटन स्थळांमध्ये हवाई वाहतुकीचा नवा अध्याय सुरु होण्याच्या वाटेवर असून, गणपतीपुळेहून जलविमान (सी-प्लेन) सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) यांच्यातर्फे राज्यातील आठ ठिकाणी जलविमान सेवा सुरू करण्यासाठी पायाभूत सर्वेक्षण सुरू झाले आहे. हे सर्वेक्षण खासगी संस्थेकडून करण्यात येत आहे. यामध्ये रत्नागिरीतील गणपतीपुळेसह पवना, गंगापूर, धोम, पेंच, कोराडी, खिंडसी आणि नागपूर येथील विविध धरणांचा समावेश आहे.
हवाई वाहतूक मंत्रालयाच्या ’उडान ५.५’ योजनेंतर्गत जलविमान व हेलिकॉप्टर सेवा देशभरात विस्तारली जाणार आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत १५० जलमार्गांवर सी-प्लेन सेवा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. सी-प्लेन ही १९ ते ९० आसनांची असणारी विमाने असून, ती सरोवर, नदी, समुद्र अथवा जलाशयांवरून थेट उड्डाण करू शकतात. विशेषतः पर्यटनस्थळांपर्यंत विमानसेवा नसेल, अशा ठिकाणी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. रत्नागिरीकरांसाठी ही सेवा केवळ पर्यटनासाठी नव्हे, तर एक नवसंजीवनी ठरू शकते, असा उत्साह सध्या स्थानिक पातळीवर पाहायला मिळतो.www.konkantoday.com