कोल्हापुरात यंदाही गणेश उत्सव कालावधीत लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध!

कोल्हापूर : प्रखर प्रकाशझोतांमुळे डोळे दिपून टाकणाऱ्या आणि प्रसंगी डोळ्यांमध्ये दोष निर्माण करणारे लेसर लाईटच्या वापरायला यावर्षी सुद्धा कोल्हापुरात प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे.

या कालावधीत गणेश मुर्ती आगमन, घरगुती गणेश मुर्ती विसर्जन मिरवणुक तसेच इतर कार्यक्रमादरम्यान लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने डोळ्याचा पडदा तसेच बुबळाला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून आयोजित मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा शो किंवा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३/१अन्यये २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईट वापरास प्रतिबंध केला आहे.

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. या मिरवणुकांमध्ये गणेश उत्सव मंडळांकडून लेझर, लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेश मुर्ती आगमन मिरवणुकीवेळी ती बघण्याकरीता आलेल्या भाविकांच्या डोळ्यावर लेझर लाईट पडल्याने व्यक्तींचा डोळ्याचा पडदा तसेच बुबळाला इजा झाल्या होत्या. गणेश उत्सव कालावधीत विसर्जन मिरवणुक तसेच इतर कार्यक्रमा दरम्यान लेझर लाईट डोळ्यावर पडल्यास व्यक्तीच्या डोळ्याचा पडदा तसेच बुबुळाला इजा होवू शकते. यासाठी हा आदेश देण्यात आला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील, असेही या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

गतवर्षीचा निर्णय कायम

कोल्हापुरात गणेशोत्सव आगमन मिरवणुकीलाच करवीर तालुक्यातील उचगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेसर किरणांचा प्रखर विद्युतझोत वापरण्यात आला होता. या विद्युतझोताची किरणे थेट डोळ्यावर पडल्याने तरुणाचा डोळा लाल झाल्याची घटना घडली होती. टेंबलाईवाडीत बंदोबस्ताला असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेसरमुळे त्रास जाणवू लागला होता. या दोन गंभीर घटना घडल्यानंतर आता कायद्याचे डोळे उघडले आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सना बंदी घातली आहे. कार्यवाहीसाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button