
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टिका कारने जोरदार धडक दिल्यामुळे महिलेचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टिका कारने जोरदार धडक दिल्यामुळे ओरोस वर्दे रोड येथील सौ. शमिका शशांक पवार (वय 27) या जागीच ठार झाल्या. तर मोपेड चालक शशांक प्रकाश पवार (40) व त्यांचे चार महिन्याचे बाळ कु.पवित्रा व साडेतीन वर्षाचा प्रभास हा सुदैवाने बचावला. हा अपघात सोमवारी दु. 12.30 वा. दरम्यान झाला. सिंधुदुर्गनगरी पोलिस, महामार्ग पोलिस व कसाल सरपंच राजन परब यांनी जखमींना रुग्णालयात हलविले.
ईर्टिका कार मुंबईच्या दिशेने जात असताना कणकवलीच्या दिशेने जाणारे शशांक पवार यांनी महामार्गावर विरोधी दिशेकडील लेनवर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी भरधाव कारची धडक पवार यांच्या मोपेडला बसली. यात मोपेडवर मागे बसलेल्या शशांक पवार यांच्या पत्नी शमिका पवार या रस्त्यावर जोरदार आदळल्या. त्यात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. तर मोपेड स्वार शशांक पवार व मयत शमिका पवार यांच्या हातात असलेली चार महिन्यांची पवित्रा व मध्ये बसलेला साडेतीन वर्षाचा मुलगा प्रभास सुदैवाने बचावला.