
संघशताब्दीनिमित्त संघ गंगा के भगीरथ नाटकाचा रत्नागिरीत प्रयोग
रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी यात्रेनिमित्त ”संघ गंगा के तीन भगीरथ; हे नाटक रत्नागिरीमध्ये ७ ऑगस्ट रोजी आयोजित केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी आणि तृतीय सरंसघचालक मधुकर दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब देवरस या महान व्यक्तींच्या जीवनावर आधारीत ही नाट्यकृती आहे.
संस्कार भारती संस्थेने या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. या नाटकाचा प्रयोग येत्या गुरुवारी दि. ७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात रंगणार आहे. राधिका क्रिएशन, पुणे नागपूर प्रस्तुत हे नाटक दोन अंकी आहे.
हे नाटक लेखक श्रीधर गाडगे यांनी लिहिले असून दिग्दर्शन संजय पेंडसे, निर्माती सारिका पेंडसे, नेपथ्य सतीश पेंडसे, संगीत डॉ. भाग्यश्री चिटणीस यांचे आहे. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली, गोळवलकर गुरुजींनी संघाचा विस्तार केला आणि देवरस यांनी संघटनेला अनुशासन आणि दृष्टी दिली. त्यामुळे हे नाटक सर्वांनाच संघ म्हणजे काय हे समजावून देणारे आहे.
हा नाट्यप्रयोग रत्नागिरीकरांसाठी विनामूल्य आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश असून प्रयोगापूर्वी किमान १५ मिनीटे पोहोचावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य गेली १०० वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. हा सतत वाहणारा प्रवाह आहे. अर्थात गंगेप्रमाणे निरंतर वाहतो आहे. म्हणून याला संघ गंगा म्हटले आहे. ही गंगा प्रवाहित ठेवणारे हे तीन भगीरथ आहेत. ही भगीरथ परंपरा संघात कायम सुरू आहे. या कार्याचे दर्शन प्रेक्षकांना होण्यासाठी हे नाट्य उभे केले आहे. या पत्रकार परिषदेला संस्कार भारतीतर्फे राजू जोशी, कौस्तुभ सावंत आणि अनिल दांडेकर उपस्थित होते.