
रत्नागिरी शहरातील ५७ सीसीटीव्ही बंद, पोलिसांकडून कंत्राटदाराविरूद्ध कठोर भूमिका
रत्नागिरी शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने गुन्ह्यांच्या तपासात अडथळे येत आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत पोलीस प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. बंद पडलेल्या कॅमेर्यांची दुरूस्ती करण्यासाठी संबंधित कंत्राटदार कंपनीला येत्या ८ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत दुरूस्ती न झाल्यास कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
रत्नागिरी शहरात एकूण ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. यापैकी तब्बल ३७ कॅमेरे सध्या बंद अवस्थेत आहेत. शहरातील प्रमुख चौक, वर्दळीची ठिकाणे आणि संवेदनशील भागातील हे कॅमेरे बंद असल्याने चोरी, अपघात आणि इतर गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना मोठी अडचण येत आहे. पुरावे गोळा करणे, आणि संशयितांचा माग काढणे जवळपास अशक्य झाले आहे. यामुळे गुन्हेगारांचे फावत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
यापूर्वी पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः या समस्येची दखल घेत बंद कॅमेर्याची तातडीने दुरूस्ती करण्याचे आदेश दिले होते. तसेच दिरंगाई करणार्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही परिस्थिती जैसे थेच राहिली. पोलिसांच्या वारंवार सूचना देवूनही कंपनीने दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याने आता प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे.www.konkantoday.com




