
रत्नागिरीत पहिल्याच वर्षी कावड यात्रेला प्रतिसाद

रत्नागिरी : पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज फडकावत आणि धार्मिक गीतांवर फेर धरत रत्नागिरीत प्रथमच सकल हिंदु समाजाने कावड यात्रा यशस्वी केली. शेकडो भाविक यात सहभागी झाले व त्यांनी राजीवड्याच्या काशिविश्वेश्वरावर कावडमधील पवित्र जलाचा अभिषेक केला.
कावड यात्रा गयाळवाडी, मरुधर विष्णू समाज स्वामीनगर येथून सुरू झाली. पारंपरिक वेशभूषा व खांद्यावर कावड घेऊन यात्रा निघाली. कावडयात्रेला सकाळी ७ वाजता सुरवात झाली. त्यानंतर कुवारबाव, साळवी स्टॉप, मारुती मंदिर मार्गे जेल नाक्यावरून कै. अरुअप्पा जोशी मार्ग, गोगटे कॉलेज येथून काशिविश्वेश्वर मंदिरात कावड यात्रा पोहोचली. कावडमध्ये विविध पवित्र नद्यांचे जल आणले होते. यामध्ये हरिद्वार येथील पवित्र गंगानदी, प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावरील जल, नर्मदा व चंद्रभागा, त्र्यंबकेश्वर येथील जल, स्थानिक नद्या काजळी व लोटेश्वर आणि बावनदी येथील जल संकलित करून कावडमध्ये भरले होते.
यात्रेत पारंपरिक गीते लावली होती. या गीतांवर नृत्य करत कावडियांनी प्रवास केला. भगवे ध्वज फडकत होते. भगव्या रंगाच्या टोप्या, पारंपरिक पांढरा झब्बा अशा वेशात कावड घेऊन अनेक लोक यात्रेत सहभागी झाले. कावड यात्रेत जवळपास १०० कावड होत्या. या सर्व कावडमधून काशिविश्वेश्वर देवावर जलाभिषेक करण्यात आला. यंदा यात्रेचे पहिलेच वर्ष होते, तरीही भरपूर प्रतिसाद मिळाला. सुरवातीला १०० जण होते. त्यानंतर नाक्यानाक्यावर लोक सहभागी झाले व सुमारे २५० जण मंदिरात पोहोचले. पुढील वर्षी याहीपेक्षा जास्त लोक सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
मरुधर विष्णू समाजाचे दीपक देवल, कांतीलाल मालवीय, चुन्नीलाल माळी, फत्तेसिंह राठोड, नरपतसिंह परिहार, विरम सिरवी आदींसह सकल हिंदु समाजाच्या अनेकांनी ही यात्रा यशस्वी होण्याकरिता मेहनत घेतली. पुढील वर्षी मोठ्या उत्साहात कावड यात्रा काढण्याचा संकल्प करण्यात आला.