ज्येष्ठ नेते, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार सन्मानित हिराचंद परशुराम ऊर्फ हिराभाई बुटाला यांचे दुःखद निधन

खेड तालुक्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार सन्मानित हिराचंद परशुराम ऊर्फ हिराभाई बुटाला (वय ८२) यांचे आज पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने खेडच्या सार्वजनिक जीवनातील एक दीपस्तंभ हरपला आहे.

हिराभाई बुटाला हे नवी मुंबईतील रेवमॅक्स कंपनीचे मालक कौस्तुभ बुटाला यांचे वडील होते. कौस्तुभ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. बुटाला कुटुंबाचा समाज, व्यापार व शिक्षण क्षेत्रात व्यापक वटवृक्ष पसरलेला आहे.

हिराभाई यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात खेडमधील किराणा व्यवसायातून केली. मात्र केवळ व्यावसायिक चौकटीत अडकून न राहता त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आणि काँग्रेस पक्षात सक्रीय सहभाग घेतला. १९८५ ते १९९० या काळात त्यांनी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या संघटन कौशल्य, शिस्तप्रियता आणि लोकांशी सहज संवादाच्या गुणांमुळे ते काँग्रेसमधील आधारस्तंभ ठरले.

त्यांचा राजकीय प्रवास अनेक मान्यवर नेत्यांशी जवळच्या संबंधांनी समृद्ध होता. इंदिरा गांधी, राजीव गांधी, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, कै. भाईसाहेब सावंत, कै. हुसैन दलवाई यांच्याशी त्यांचे स्नेहसंबंध होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन नवी दिल्ली येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

शिक्षण क्षेत्र हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानणाऱ्या हिराभाई बुटाला यांनी १९७३ साली सहजीवन शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यानंतर सलग ५२ वर्षे त्यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्य पाहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आय.सी.एस. महाविद्यालय, हिराचंद पर्शुराम बुटाला आय.टी. कॉलेज, मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, सहजीवन प्रायमरी स्कूल अशा अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या.

त्यांच्या निधनानंतर संस्थेच्या सर्व शाखांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली व शालेय कामकाज बंद ठेवण्यात आले. त्यांच्या व्यावसायिक उपक्रमांमध्ये एच.पी. बुटाला किराणा दुकान, लक्ष्मी मसाले इंडस्ट्रीज, एचपी गॅस सर्व्हिसेस यांचा समावेश होता. या सर्व आस्थापना आज बंद ठेवण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button