
उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचण्याआधीच खा.प्रियंका चतुर्वेदी मोदींच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, ही भेट पूर्णपणे ‘सहज’ होती आणि तिचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण चतुर्वेदी यांनी दिले आहे.इंडिया’ आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, ज्यावर आता स्वतः चतुर्वेदी यांनी पडदा टाकला आहे. सोमवारी (दि.४) पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी आपण खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.पंतप्रधान मोदींसोबत झालेली भेट ही राजकीय नव्हती, असे उबाठा पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ठामपणे सांगितले आहे. “पंतप्रधान यांच्यासोबत माझी चांगली चर्चा झाली. मात्र, यामध्ये महाराष्ट्राच्या अनुषंगाने किंवा इतर कोणताही राजकीय संवाद झाला नाही. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ लावण्यात काहीही तथ्य नाही,” असेही त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत येत असतानाच ही भेट झाल्याने तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.