
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त जी.पी.एस च्या विद्यार्थ्यांनी दिली टिळक स्मारकाला भेट
१ ऑगस्ट रोजी ‘लोकमान्य टिळकांची’ १०५ वी पुण्यतिथी पार पडली.’स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणाऱ्या टिळकांनी स्वराज्याचा हा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचवला. स्वराज्य हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट होते. टिळकांसारखा ध्येयवादीपणा, त्यांची बुद्धिमत्ता,धैर्य,नेतृत्व क्षमता,देशभक्ती यांसारखे अनेक गुण आजच्या पिढीमध्ये झिरपावेत यासाठी अशा थोर व्यक्तींचे स्मरण करणे गरजेचे आहे.
म्हणूनच जी.जी.पी.एस च्या ‘स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी’ विभागाच्या या येणाऱ्या पुढील पिढीच्या चिमुकल्यांनी लोकमान्य टिळकांच्या स्मारकाला म्हणजेच त्यांच्या जन्मस्थानाला भेट दिली. टिळकांच्या या घरातील बऱ्याच गोष्टी या घराला जिवंतपणा देतात. त्यांच्या कार्याची प्रेरणा मुलांनी लहान वयातच घेऊन पुढील वाटचाल करावी या उपक्रमाचा हेतू होता आणि पालकांच्या सहकार्याने या उपक्रमाला चांगले यश मिळाले व कौतुकाची थापही पालकांकडून मिळाली. टिळकांच्या स्मरणात विद्यार्थ्यांनी तिथे त्यांची काही गीते गायली. आपल्या सर्वांनाच खरंतर ही अभिमानाची गोष्ट आहे की आपण टिळकांसारख्या थोर व्यक्तीच्या जन्मभूमीवर राहत आहोत.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा आनंद घेतला.या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली पाटणकर,प्राथमिक विभागाच्या सौ.अपूर्वा मुरकर,प्री प्रायमरी विभागाच्या सौ.शुभदा पटवर्धन,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचेच सहकार्य लाभले.