चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामात निष्काळजीपणा; विद्यार्थ्याच्या हातावर लोखंडी सळी, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको


  • मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात पुन्हा एकदा निष्काळजीपणा समोर आला आहे. डीबीजे महाविद्यालयासमोर एका पिलरवरून टाकण्यात येत असलेली लोखंडी सळी अचानक रस्त्यावर कोसळून ती रस्त्याने जात असलेल्या विद्यार्थ्याच्या हातावर पडली. यात संबंधित विद्यार्थी बालंबाल बचावला असला तरी त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. शिंदे युवासेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन छेडले. त्यामुळे सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

गेल्या काही वर्षांपासून बहादूरशेखनाका ते पाग बौद्धवाडीदरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू असून सुरुवातीपासूनच या कामाला विविध कारणांनी वादग्रस्त स्वरूप प्राप्त झाले आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी बहादूरशेखनाक्याजवळ गर्डर कोसळल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर काही महिन्यांत दोन कामगार पिलरवरून पडून गंभीर जखमी झाले होते. याशिवाय, सुरक्षेसाठी लावलेली जाळी ट्रकला अडकल्यानेही अपघात घडले होते.

अशा घटनांमुळे परिसरातील नागरिकांत संताप असून अनेकदा प्रशासनाने संबंधित ठेकेदार कंपनीला सुरक्षेच्या सूचना दिल्या होत्या. तरीही कामात निष्काळजीपणा दिसून येत आहे. सोमवारी घडलेली घटना हे त्याचेच ताजे उदाहरण ठरले. अथर्व शिंदे या विद्यार्थ्याच्या हातावर सळी पडून त्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button