हा देश अंबानीच्या मुलाच्या बापाचा नाही’, कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीसाठी कुणाल कामराही मैदानात!

: गेली ३५ वर्षे कोल्हापूरच्या शिरोळमधील नांदणी गावातील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी ही हत्तीण गुजरातच्या जामनगर येथील ‘वनतारा’ मध्ये नेण्यात आली आहे. यावरून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. त्या विरोधात तीव्र जनभावना निर्माण होत असून अनेक गावांमध्ये आंदोलने केली जात आहेत. यादरम्यान या लढ्यात आता स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने देखील उडी घेतली आहे.

कुणाल कामरा हा त्याच्या स्टँडअप कॉमेडीमधून सतत देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत असतो. यामुळे बऱ्याचदा तो वादात देखील सापडला आहे. आता पुन्हा एकदा त्याने सोशल मीडियावर अशीच पोस्ट केली आहे. यावेळी त्याने त्याच्या पोस्टमध्ये महादेवी या हत्तीणीला कोल्हापूरकरांना परत दिले जावे असे म्हटले आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये कामरा म्हणाला की, “ये देश अंबानी के बेटे के बाप का नहीं है (हा देश अंबानीच्या मुलाच्या बापाचा नाही). माधुरी/महादेवीला कोल्हापुरला परत करा…”. याबरोबरच त्याने महादेवीचा फोटो देखील पोस्ट केला आहे. कुणाल कामराच नाही तर मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत महादेवीला परत आणण्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत

दरम्यान महादेवीला नेण्यात आले आहे तो वनतारा प्रकल्प हा मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांची कल्पना आहे आणि या वनतारा प्रकल्पाला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनचे पाठबळ आहे.

अंबानीविरोधात रोष वाढला

अंबानी समूहाच्या वनतारा प्रकल्पामध्ये महादेवीला नेल्यानंतर या समूहाच्या विविध उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी जिओचा मोबाइल क्रमांक पोर्ट केल्याचा दावा केला जात आहे. हत्ती परत आणण्यासाठी अंबानी समूहाच्या जिओचे मोबाइल नंबर बदलून बहिष्कार मोहीम राबवली जात आहे. आमदार राहुल आवाडे यांनीही आपल्याकडील जिओचा एक नंबर दुसऱ्या कंपनीत बदलत असल्याचे सांगितले. दरम्यान लोकांची भावना पाहाता वनताराच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना यश कधी येते हे पहावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button