
सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेतील ११ पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे!
सोलापूर : शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी पक्षातील वाढत्या गटबाजीला कंटाळून अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यापाठोपाठ त्यांच्या काही समर्थक – पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला आहे. एका पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्हा समन्वयक, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी भूमिका स्पष्ट केली. आपल्यासमवेत ११ पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. येत्या चार दिवसांत वाट पाहून पुढची दिशा ठरविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुढील चार दिवसांत पक्षश्रेष्ठींनी जर आमची दखल घेतली नाही, तर पक्षात राहायचे की नाही, असा संदेश या पत्रकार परिषदेतून देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिलीप कोल्हे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, वैद्यकीय सेलचे प्रमुख जवाहर जाजू, नवनाथ भजनावळे, सागर शिंदे, आशिष परदेशी, राहुल काटे आदी पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय पंढरपूर विभागाचे जिल्हा संघटक संजय बनपट्टे व जिल्हा उपप्रमुख महादेव देशमुख यांनीही प्रा. सावंत यांच्या समर्थनार्थ पदाचा राजीनामा दिला आहे.
दिलीप कोल्हे म्हणाले, की प्रा. शिवाजी सावंत यांना जाणीवपूर्वक कमी लेखण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यांच्या स्वतःच्या माढा तालुक्यातील पदाधिकारी नेमताना त्यांना साधे विचारलेदेखील नाही. गेल्या माढा विधानसभा मतदारसंघात ७६ हजार मते घेतलेल्या संजय कोकाटे यांच्यासह अन्य दोघांची वर्णी लावली. त्यामुळे प्रा. सावंत हे प्रचंड दुखावले गेले आहेत. त्यांचा रोष प्रामुख्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख महेश साठे यांच्यावर असल्याचे दिसून येते.
चार दिवसांत पुढची दिशा
आपल्यासमवेत ११ पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. येत्या चार दिवसांत वाट पाहून पुढची दिशा ठरविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुढील चार दिवसांत पक्षश्रेष्ठींनी जर आमची दखल घेतली नाही, तर पक्षात राहायचे की नाही, असे ठरवू असे सोलापूर जिल्हा समन्वयक, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी सांगितले.