
……तर मोदी पंतप्रधान झालेच नसते, लोकसभेत 100 जागांवर हेराफेरी; राहुल गांधी यांचा दावा!
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मतांची मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याचा पुनरुच्चार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. ‘किमान 70 ते 100 जागांवर ही हेराफेरी झाली आहे. या हेराफेरीतून 15 जागा जरी सुटल्या असत्या तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते, असा हल्ला राहुल गांधी यांनी केला.
नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या कायदेविषयक मेळाव्यात ते बोलत होते. ‘हिंदुस्थानातील निवडणूक व्यवस्था मृत झाली आहे. जी संस्था निवडणुका घेते तीच ताब्यात घेतली गेली आहे. काही जागांच्या निसटत्या बहुमतामुळे आपले पंतप्रधान त्या खुर्चीवर बसले आहेत हे विसरता कामा नये, असे ते म्हणाले. ‘लोकसभा निवडणूक चोरली जाऊ शकते आणि चोरली गेली हे मी लवकरच सिद्ध करून दाखवणार आहे. मी हे बोलू शकतो, कारण माझ्याकडे 100 टक्के पुरावा आहे. ज्या कोणाला मी हा पुरावा दाखवला तो अक्षरशः खुर्चीतून पडलाय’ असे राहुल गांधी म्हणाले.
जेटलींनी मला धमकी दिली
कृषी कायद्यांविरोधात जेव्हा मी लढत होतो तेव्हा तत्कालीन मंत्री अरुण जेटली यांना मला धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते. तुम्ही कृषी कायद्यांवरून सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर तुमच्यावर कारवाई करावी लागेल, असे जेटली म्हणाल्याचे राहुल गांधी म्हणाले.