
गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत अर्णव अजित कदम चिपळूण तालुक्यात प्रथम
सावर्डे : गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर (ISO मान्यताप्राप्त संस्था) यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात नियोजनपूर्वक राबविण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा (Gurukul Talent Search – GTS) २०२४-२५ मध्ये चिपळूण तालुक्यातील अर्णव अजित कदम याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अर्णव हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव क्र. १ येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेत होता. या परीक्षेत त्याने तालुकास्तरावर पहिला क्रमांक मिळवत शाळेचा, शिक्षकांचा आणि पालकांचा मान उंचावला आहे. सध्या अर्णव इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे.
गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेसाठी नांदगाव शाळेतील एकूण चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अर्णवने उत्तम कामगिरी करत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरावे, असे यश संपादन केले. यशामागे वर्गशिक्षिका सौ. वर्षा आंबले मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय कांबळे सर यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले.
गुरुकुल एज्युकेशन सोसायटी – एक विश्वासाचे नाव
गेल्या १२ ते १५ वर्षांपासून गुरुकुल एज्युकेशन सोसायटी ही संस्था विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील नेतृत्वगुण, तर्कशक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. “भविष्यासाठी योग्य दिशा दाखवणं” हेच या संस्थेचे प्रमुख ध्येय असून त्याच उद्देशाने GTS परीक्षा दरवर्षी घेतली जाते.
अर्णव अजित कदमच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि स्थानिक शिक्षणवर्गाने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.