
काय उखडायचं ते उखडा. संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज, म्हणाले मुख्यमंत्रिपद गेल्यावर…
मुंबई : “मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय उखाडायचे ते उखडा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत हे राज्य मराठी माणसांचे आहे. आमच्या १०६ हुतात्म्यांनी इथे बलिदान दिले आहे. तुम्ही दिलेले नाही. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात, ज्या दिवशी तुमचे मुख्यमंत्रिपद जाईल, तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात”, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
खोक्याची भाषा फडणवीसांनी करु नये
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच एका मुलाखतीदरम्यान मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार असे म्हटले होते. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केले. “देवेंद्र फडणवीस यांचे जे सरकार आहे, या सरकारची निर्मिती खोक्यातून झाली आहे. ज्यांनी ५० खोके एकदम ओके अशी घोषणा कैलास गोरंट्याल यांनी दिली होती. त्यावेळी ते आमदार होते. यांनी विधानभवनाच्या आवारात विधानसभा सुरु असताना ही घोषणा त्यांनी दिली आणि मग ती देशात पसरली. आता ५० खोके एकदम ओके बोलणारे कैलास गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात आहे. कैलास गोंरट्याल यांनी सांगितलं आहे की एका एका मतदार संघात निवडणूक जिंकण्यासाठी १०० कोटी खर्च केले. सरकारी वाहन, पोलिसांच्या वाहनातून पोलिसांचे वाटप सुरु होते. त्यानंतर गोंरट्याल असे म्हणतात की आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार. त्यामुळे मला भाजपात यावं लागलं हे काल कैलास गोरंट्याल म्हटले आणि आज भाजपात आले. तेव्हा खोक्याची भाषा फडणवीसांनी करु नये”, असे संजय राऊत म्हणाले.
उद्धव आणि राज एकत्र झालेत त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत
“राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी १०० जागांवर कशाप्रकारे हेराफेरी केली, याबद्दल जी मोहीम उघडली आहे, त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी बोलायला हवं. त्यांच्या मंत्रिमंडळात जे मंत्री बसलेले आहेत, अजूनही त्यांच्याकडे खोक्यांची ओढाताण सुरु आहे, त्यावर त्यांनी बोलावं. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत, बेरोजगारी वाढते त्यावर त्यांनी बोलायला हवं. किती काळ तुम्ही उद्धव ठाकरेंवर अडकून पडणार आहात. आता उद्धव आणि राज एकत्र झालेत त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना गंमतीजंमती करायची सवय आहे, याकडे एक विनोद म्हणून पाहायला हवं”, असेही संजय राऊतांनी म्हटले.
गुजरातमध्ये हिंदी सक्ती करा मग महाराष्ट्रावर ती लादा
“मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय उखाडायचे ते उखडा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत हे राज्य मराठी माणसांचे आहे. आमच्या १०६ हुतात्म्यांनी इथे बलिदान दिले आहे. तुम्ही दिलेले नाही. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात, ज्या दिवशी तुमचे मुख्यमंत्रिपद जाईल, तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात. मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची गरज लागली तर ते आम्ही होणार. तुम्ही मुरारजी देसाई व्हायला जाताय का, आमच्यावर गोळ्या घालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह करतोय म्हणून. हो आम्ही करतोय मराठीचा आग्रह. आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह करत नाही. तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा मग महाराष्ट्रावर ती लादा”, असे संजय राऊतांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस हे अपयशी मुख्यमंत्री
“राज ठाकरे यांनी सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा वीस लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरात मधून मारून हाकलून दिलं.. त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही नंतर आमदार केला तुम्ही आम्हाला काय सांगत आहात. तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा काय म्हणतात ते पहा अमित शहा बोलत आहेत आम्ही गुजराती मग मी मराठी का बोलू शकत नाही. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे .देवेंद्र फडणवीस का तुम्हाला काय करायचं आहे ते करा. देवेंद्र फडणवीस हे अपयशी मुख्यमंत्री त्यांचा फक्त फुगा फुगवला आहे, जसे नरेंद्र मोदी यांची हवा भरले फुग्यात आहे कसे देवेंद्र फडणवीस यांच्यात हवा भरली आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.