
अखेर दादरचा कबुतरखाना झाला बंदिस्त!
मुंबई : न्यायालयाच्या आदेशानुसार, कबुतरांना दाणे, खाद्यपदार्थ खायला घालण्यास मनाई आहे. मात्र तरीही कबुतरप्रेमी कबुतरांना दाणे खायला घालत असल्याचे निदर्शनास येते आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने शुक्रवारी रात्री तर शनिवारी सांयकाळी कबुतरखान्यावर कारवाईचा प्रयत्न केला असता, जैन समाजातील नागरिकांसह कबुतरप्रेमींनी विरोध दर्शवला.
मात्र शनिवारी सायंकाळी उशिराने महापालिकेच्या कर्मचार्यांनी पोलिस बंदोबस्तात दादर येथील कबुतरखाना जाळी आणि बांबूच्या ताडपत्रीने बंदिस्त केला. तसेच, कबुतरांना दाणे टाकणार्यांवर नजर ठेवण्यासाठी चारही बाजूने सी. सी कॅमेरे बसविण्यात आले. या कारवाईमुळे रात्री उशिरापर्यंत कबुतरखाना परिसरात स्थिती तणावपूर्ण होती. कडक पोलीस बंदोबस्त पालिकेने कारवाई फत्ते केली.
गेल्या महिन्यांत पालिका जी/ उत्तर विभागाने दादर कबुतरखान्यावरील लोखंडी शेड, लगतचे पत्रे काढले होते. तसेच साचून ठेवलेले धान्य जप्त केले होते. मात्र त्यानंतरसुध्दा कबुतरांना दाणे टाकणे सुरूच होते.
दादर कबुतरखाना येथे कबुतरांना दाणे घालणे बंद करण्यासाठी महापालिकेचे पथक शुक्रवारी रात्री उशिराने कारवाईसाठी गेले होते. मात्र त्यावेळी काही कबुतरे आजारी असल्याने त्यांचा विचार करता तूर्तास कारवाई करू नका, असे सांगत कबुतरप्रेमींनी मुदत मागून घेतली होती.
तसेच पालिकेच्या कारवाईला विरोध दर्शवला होता. त्यामुळे पालिका पथकाला माघारी परतावे लागले होते. मात्र शनिवारी सायंकाळी पुन्हा उशिरा पालिकेच्या पथकाने कबुतरांना दाणे टाकण्याच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात धडक देत कारवाईला सुरुवात केली. त्या दरम्यानही परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. आणि कारवाई करून पालिका मोकळी झाली.