हर्णे बंदरामधून मासेमारी हंगामाला जलद सुरुवात; पहिल्याच दिवशी ५० हून अधिक नौकांचे सागराकडे झेपावल्या!

दापोली : महाराष्ट्रातील दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीची मुदत ३१ जुलै रोजी संपली असून, हर्णे बंदरामधून १ ऑगस्ट पासून नव्या मासेमारी हंगामाला जलद व उत्साही सुरुवात झाली आहे. सुमारे ५० हून अधिक नौका समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांच्या बंदी कालावधीत मच्छीमारांनी नौकांची डागडुजी, जाळींची तयारी, डिझेल व इतर आवश्यक सामग्रीची जमवाजमव यामध्ये गुंतले होते. यंदाच्या हंगामाकडून चांगल्या उत्पादनाची आशा मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.

सध्या कोकण किनारपट्टीवर वातावरण अनुकूल असले तरी काही भागांत वादळी वार्‍याचा इशारा असल्याने नौकांवर नियंत्रण व सतर्कतेची आवश्यकता आहे. मासेमारीसाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे अनेक मच्छीमारांनी मुहूर्त साधला आहे. चांगले वातावरण या हंगामात मिळाले तर मासळी चांगल्या प्रकारे मिळू शकते आणि बहुतांशी मच्छिमार या हंगामात उद्योगात उतरतील, असा विश्वास मच्छीमार बांधवांनी व्यक्त केला आहे.

हर्णे बंदरातील मागील ५ वर्षांचे मासळी उत्पादन (मे.टन): – २०१९ – २० – १९०१८ ; २०२० – २१- १८१३०; २०२१-२२ – १४११७; २०२२-२३ – ९००१; २०२३-२४ – १७०२३ असे उत्पादन झाले आहे. २०२२-२३ मध्ये उत्पादनात मोठी घट झाली होती. परंतु मागील वर्षी उत्पादनात सुधारणा झाल्याने यंदाच्या हंगामाकडूनही आशा व्यक्त केली जात आहे. आंजर्ले खाडीला सकाळी ओहोटी लागेल याची कल्पना मच्छीमाराना आधीच असल्याने किमान ५० हुन अधिक मच्छीमारांनी आधीच म्हणजे गुरुवारी सायंकाळी भरतीच्या वेळेस नौका खाडीतून बाहेर काढून किल्ल्याजवळ नेल्या व शुक्रवारी सकाळी मासेमारीला गेले आहेत. गेल्यावर्षी सुरुवातीचे वातावरण खराब असल्याने मुहूर्त टळला होता.

ऑगस्ट – सप्टेंबर महत्त्वाचे महिने

कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई या जिल्ह्यांत मासेमारी मोठ्या प्रमाणावर होते. ऑगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने मच्छीमारांसाठी अत्यंत निर्णायक असतात. या काळात पापलेट, बांगडा, सुरमई, कोळंबी, हलवा, मांदेली यासारख्या प्रजाती भरपूर मिळतात आणि बाजारात चांगल्या दराने विकल्या जातात.

बंदीमुळे मासेमारी थांबली होती.

१ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी असते. हा काळ माश्यांच्या प्रजननासाठी राखीव असल्याने या काळात मासेमारीस परवानगी दिली जात नाही. ही बंदी संपल्यावर १ ऑगस्टपासून हंगाम सुरू होतो. यंदा हवामानाशी समन्वय साधून हंगामाची सुरुवात होत असल्याने मच्छीमार आशावादी आहेत.

शुक्रवारी किमान ५० नौका मासेमारीला गेल्या आहेत. भरतीच्या वेळेसच नौका किल्ल्याजवळ बाहेर काढून घेतल्या गेल्या आणि सर्व मासेमारीला गेले आहेत. वातावरण चांगले असल्यामुळे बऱ्यापैकी मासळी मिळेल अशी अपेक्षा हर्णे बंदर कमिटी उपाध्यक्ष प्रकाश रघुवीर यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button